धुळे : शिकण्याच्या वयातच घरफोडीचा नाद! पिंपळनेर पोलिसांकडून टोळी गजाआड

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर शहरासह सामोडेत घरफोडीच्या घटना लागोपाठ घडत असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परिणामी, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौघा चोरट्यांपैकी तीन जण अल्पवयीन आहेत. शिकण्याच्या वयातच त्यांनी घरफोड्या करण्यास सुरु केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या टोळीतील मुख्य म्होरक्याचा शोध सुरु आहे.

पिंपळनेर-सामोडे गावातील घरफोडींची उकल!

शहरातील हरिओम नगरात राहणारे दिलीप आनंदा महाजन याचे बंद घर चोरट्यानी फोडले होते. ही घटना ३१ डिसेंबर रोजी घडली होती. तसेच १० जानेवारी रोजी सामोडे गावातही ५ ठिकाणी घरफोडी घटना घडल्या होत्या. सामोडेचे किरण विलास घरटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

पेट्रोलिंगदरम्यान टोळी पावली!

चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळनेर पोलिसांनी विशेष पथकाचे गठन केले. पिंपळनेर आणि सामोडे परिसरात घडलेल्या घरफोडींबद्दल पोलिसांना काही गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पेट्रोलिंग करताना संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यात रुपेश शशी पवार (वय १८) यांच्यासह अन्य तिघांची चौकशी केली असता, त्यांनी पिंपळनेर आणि सामोडे गावात घरफोडी केल्याचे मान्य केले. तसेच त्यांच्याकडील २५ हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.

म्होरक्या पांग्या फरार

घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीमध्ये दोन सज्ञान आणि तीन जण अल्पवयीन आहेत. यातील दोन जण अवघे १५ वर्षाचे आहेत. तर टोळीचा म्होरक्या पवन उर्फ पांग्या उत्तम भारत हा फरार झाला आहे. टोळीतील सर्व सदस्य हे पिंपळनेर शहरातीलच एका श्रमिकांच्या वस्तीत राहतात. तेथेच त्यांनी टोळी बनवली व बंद घरांना ते टार्गेट करुन चोरी करण्यास सुरुवात केली. चोरीतील पैशातून त्यांची मौजमजा चालायची. पोलिसांनी रुपेश पवार याला गजाआड केले असून तिघा अल्पवयीन तरुणांना बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कौतुकास्पद कामगिरीचे मानकरी

सदरची कामगिरी एसपी संजय बारकुंड, पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे, बी.एम.मालचे, पोलीस उपनिरीक्षक बी.एम.माळचे, एएस आय.बी. आर.पिंपळे, पोलीस हेमंत पाटोळे, राकेश बोरसे, रविंद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, विजयकुमार पाटील, सोमनाथ पाटील, नरेंद्र परदेशी यांनी केली.

जनतेने खबरदारी घ्यावी

दिवसा रेकी करायची अन् रात्रीत बंद घर फोडायचे अशा पद्धतीने ही टोळी करायचे. लोकांनी बाहेरगावी जाताना विशेष खबरदारी घ्यावी. रात्री घराबाहेरील लाईट सुरु ठेवाव्यात, शेजारील लोकांचे मोबाइल नंबर जवळ बाळगावे, बाहेरगावी जात असल्यास मौल्यवान ऐवज घरात ठेऊ नये, परिसरात कोणीही संशयित व्यक्ती दिसत असल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. १५२ या हेल्पलाईन क्रमांकावरून मदत घ्यावी.

हेही वाचा

The post धुळे : शिकण्याच्या वयातच घरफोडीचा नाद! पिंपळनेर पोलिसांकडून टोळी गजाआड appeared first on पुढारी.