
धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून तरुण शेतकरी बालंबाल बचावला असून चेहऱ्यावर ८-१० टाके पडले आहेत. विशेष म्हणजे भर दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.
घोडदे येथील तरुण शेतकरी मनोहर संभाजी क्षिरसागर (३२) हा दुपारी आपल्या शेतात फडतर कपाशी काढण्यासाठी गेला होता. शेतातून कपाशी वेचणी झाल्यानंतर शेजारील १०० मीटर अंतरावर दुसऱ्या शेतात कपाशी वेचणी करण्यासाठी मजूराला सोडले. त्यानंतर पुन्हा पहिल्या शेतात आल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची आऊटलेट (बेड) बंद करत असताना दुपारी १२.४५ च्या सुमारास मादी बिबट्या व तिचे पिल्लू आले. यावेळी मादी बिबट्याने मनोहर क्षिरसागर याच्यावर अचानक हल्ला चढविला. या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी मनोहर याच्या चेहऱ्यावर जखमा केल्या असून ८ ते १० टाके पडले आहेत. भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
सध्या कांदा, गहू, हरबरे, मका, ऊस व भाजीपाला पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यातच आता दिवसाही बिबट्यांचा वावर आढळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत सापळा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला तरुण शेतकरी हा घोडदे येथील प्रगतशील शेतकरी व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिंगबर मालजी पाटील यांचा पुतण्या आहे.
हेही वाचा :
- पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन
- कांदा प्रश्नावरुन सभागृहात छगन भुजबळ आक्रमक
- राहुरी : तू आमच्या घरातील भांडे चोरले, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात वार
The post धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.