धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी

नाशिक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पावसाच्या पाण्यासोबतच सांडपाणी देखील घरासमोर येत असल्याच्या किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारीत चोरी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री शहरातील ओम शांतीनगरात ही घटना घडली आहे. हाणामारीनंतर आशियाना रहीम खाटीक यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आशियाना या घरी एकट्या असताना शेजारी राहणारे संतोष अर्जुन खरे, गौतम अर्जुन खरे, हेमंत खरे, उमेश अशोक मगरे, मच्छिंद्र अशोक मगरे यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर  पाचही जणांसह सरला खरे आणि माधुरी खरे या देखील आल्या. संपूर्ण जमावाने मारहाण करत विनयभंग केला. तसेच आशियाना यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पती रहिम खाटीक व भाऊ गणी हे खरे कुटुंबियांस समजावण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे शेजारी सरला संतोष खरे यांनी देखील तक्रार नोंदवली असून तक्रारीत शौचालय आणि बाथरूमचे सांंडपाणी खरे यांच्या घराजवळ येत असल्याने त्यांनी खाटीक परिवाराला वारंवार समजावून सांगितले. यावरुन दोन कुटुंबात वाद सुरु होता. वादाचे पर्यवसन मारहाणीत होऊन संतोष खरे यांच्यावर खाटीक परिवाराने लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात सरला खरे यांचा विनयभंग होऊन त्यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र आणि पैसे हिसकावून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानुसार गणी खाटीक, रहीम खाटीक, शोएब खाटीक, जावीद तांबोळी, हनिफ तांबोळी, जुबेर तांबोळी, फैसल तांबोळी, आसिफ पठाण, इसराइल शहा आदींच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी appeared first on पुढारी.