धुळे : सामोडेत एकाच रात्री तब्बल सहा घरफोड्या

घरफोडी,www.pudhari.news

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील सामोडे येथील वेगवेगळ्या भागात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामोडे येथील नाना कृष्णा कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त पोलिस कर्मचारी निंबा सुपडू घुगे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप, कडी-कोंडका तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर कपाट फोडले. पण चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा दत्त नगरातील रहिवासी साहेबराव बुधा शिंदे, डॉ.प्रभाकर महारू काकुस्ते, निंबा उखा शिंदे यांच्या घराकडे वळवला. तिघांच्या घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. तसेच साहित्य फेकून दिले. या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर माध्यमिक शिक्षक राजेंद्र पुंडलिक शिंदे यांचे घर चोरट्यांनी फोडले. शिंदे यांच्या घरातून अंदाजे 18 ते 20 तोळे सोने व ८ हजार रुपये रोख असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच कमलाबाई आनंदा घरटे यांच्या घरातून तांबे व पितळीचे भांडे लांबवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला. एकाच रात्री सहा ठिकाणी हात सफाई करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. गावात भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा :

The post धुळे : सामोडेत एकाच रात्री तब्बल सहा घरफोड्या appeared first on पुढारी.