
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे महानगरपालिकेने हद्दवाडी मध्ये समावेश केलेल्या 11 गावांमधील मालमत्ता धारकांना बजावलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटीस विरोधात आज शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. महानगरपालिकेच्या आवारात निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांनी या नोटीसीचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. महानगरपालिकेने तातडीने वाढीव घरपट्टी रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
धुळे महानगर पालिका प्रशासनाकडून वलवाङी, वाङीभोकर सह नविन 11 गावे हद्द वाढीमध्ये धुळे महानगरात समाविष्ट केली आहे. यासाठी या ग्रामपंचायतींचे सर्व कागदपत्रे महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली असून सध्या या वाढीव अकरा गावांमधील मालमत्तांचे सर्वेक्षण करून संबंधित मालमत्ता धारकांना वाढीव घरपट्टी संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात या मालमत्ता धारकांना महापालिकेत हरकती दाखल करण्याचे आवाहन केले असून या हरकतींवर सुनावणी देखील करण्यात आली आहे. मात्र ही वाढीव घरपट्टी अवाजवी असून या विरोधात आज शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चा काढून शिवसैनिकांनी महापालिकेत आपला रोष व्यक्त केला आहे. या नोटीसची होळी करून शिवसैनिकांनी महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. धुळे शहरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी आकारण्यात आली आहे. या सदर्भात मनपा प्रशासनाने नागरिकांना नोटीस दिल्या असून त्या त्वरीत मागे घेऊन नविन करआकारणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही वाढीव करवाड रद्द न केल्यास शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामध्ये सह संपर्क प्रमुख महेश मिस्त्री, हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उप जिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, देविदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, जयश्री वानखेडे, पुष्पा बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी नोटीसांची होळी करण्यात आली.
हेही वाचा :
- वृद्धेश्वर परिसरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन
- नगर : कोरठणला रंगला कुस्त्यांचा आखाडा
The post धुळे : हद्दवाडीतील 11 गावांमधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.