
धुळे पुढारी वृत्तसेवा
धुळ्याच्या उपमहापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याने विरोधकांचा विरोध केवळ नावालाच दिसून आला. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या गरजांकडे जातीने लक्ष देणार असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली.
धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत. गेल्याच वर्षी भाजपाचे स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे ही एक जागा रिक्त आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या सहा, एमआयएमचे चार, समाजवादी पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, अपक्ष एक आणि बसपाचा एक असे पक्षीय बलाबल आहे. यात 50 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे उपमहापौर पदावर याच पक्षाचा सदस्य विजयी होणार असल्याचे चिन्ह स्पष्ट होते. त्यातच पक्षाच्या वतीने नागसेन बोरसे यांना संधी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सोमवारी, दि.12 जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी नगरसचिव मनोज वाघ यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागसेन बोरसे यांना 50 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोमीन आसिफ इस्माईल यांना 20 मते मिळाली .एमआयएमचे सईद बेग, हाशिम बेग यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर तीन सदस्य अनुपस्थित होते. उपमहापौर पदावर नागसेन बोरसे यांची निवड जाहीर होतात महापौर प्रदीप करपे, नगर सचिव मनोज वाघ यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना नागसेन बोरसे यांनी शहरातील जनतेला दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच महानगरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत करण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:
- बेळगाव : म. ए. समितीचा महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार : विश्वेश्वर हेगडे कागेरी
- नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा
- पुणे : उपचार करताना मांजराचा मृत्यू झाल्याने डॉक्टरला मारहाण करत क्लिनिकची तोडफोड
The post धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड appeared first on पुढारी.