धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

निर्घृण हत्या www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारात मोकळ्या मैदानात तरुणाच्या डोक्यात वजनदार दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज गुरुवार, दि.23 रोजी उघडकीस आला आहे. हत्या करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी तरुणाबरोबर घटनास्थळावर रंगीत संगीत पार्टी केल्याचा पोलिसांना संशय असून घटनास्थळावरून बियरचे टिन आणि प्लास्टिकचे ग्लास आढळून आले आहेत.

धुळे शहरातील अवधान शिवारात असणाऱ्या सोना दोर नामक कंपनीच्या मागील बाजूस मोठे मैदान आहे. या मैदानामध्ये चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांना घेण्यासाठी लक्ष्मण वाघ नामक व्यक्ती गेले. यावेळी त्यांना या मैदानाच्या एका भागात तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याने ही माहिती पोलिसांना कळवली. त्यामुळे मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळावर तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. तर वजनदार दगड डोक्यात टाकल्यामुळे त्याचे डोके फुटल्याची बाब देखील निदर्शनास आली. ही माहिती परिसरात पोहोचल्यामुळे मैदानाजवळ गर्दी झाली.

दरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळावर प्राथमिक तपास सुरू केला. यावेळी मृतदेहाच्या हातावर गोंदवलेल्या नावावरून तो मोहाडी परिसरातील दंडेवाला बाबा नगरात राहणारा सतीश बापू मिस्तरी असल्याचे निदर्शनास आले. हा मयत तरुण रिक्षा चालकाचे काम करीत होता. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या परिवाराला ही माहिती देण्यात आली. त्यामुळे परिवारातील सदस्यांनी घटनास्थळी येऊन आक्रोश सुरू केला. दरम्यान, ही हत्या रात्री झाली असावी असा पोलिसांना संशय असून घटनास्थळावर बिअरचे रिकामे टीन आणि प्लास्टिकचे ग्लास आढळून आले आहेत. तर मयत सतीश याच्या डोक्याचे अवशेष याच घटनास्थळावर विखुरलेले आढळून आले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले असावे असाही संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान या तरुणाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक कार्यरत झाले आहे.

हेही वाचा:

The post धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या appeared first on पुढारी.