धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आंदोलन स्थळापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याने समाजासाठी ते आता मृत झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली आहे. (Maratha Reservation)

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलकांनी जिल्ह्यात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला असून मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे ही बैठक रद्द झाली. तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला देखील विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे हा मेळावा रद्द झाला आहे. (Maratha Reservation)

दरम्यान या आंदोलनात आज कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मंत्री तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला रोष व्यक्त केला आहे. आंदोलन स्थळापासून काढण्यात आलेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नेण्यात आली. यानंतर मंत्री नारायण राणे तसेच माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त करण्यात आला. यानंतर प्रतिकात्मक तिरडीचे दहन करण्यात आले.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आंदोलक विनोद जगताप यांनी सांगितले की, स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून घेणारे भावनाशून्य केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची गरज नसल्याचे सांगितले. या दोन्ही नेते आणि त्यांची मुले हे आमदार, खासदार आणि मंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र गोरगरीब आणि कष्टकरी शेतकरी मराठा आरक्षणासाठी धडपडतो आहे. लाखो रुपयांची फी शैक्षणिक कामासाठी भरावी लागते. तर आरक्षणाच्या नावाखाली या समाजाच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होते. पण या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजा संदर्भात चुकीचे वक्तव्य काढल्यामुळे आज त्यांचा निषेध नोंदवत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात आबा कदम, प्रदीप जाधव, साहेबराव देसाई, हेमंत भडक, दीपक रवंदळ, बाजीराव खैरनार, राजेंद्र ढवळे, राजेंद्र इंगळे, अशोक सुडके, निंबा मराठे, यांच्यासह असंख्य आंदोलन सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा  appeared first on पुढारी.