Site icon

धुळ्यात ‘पठाण’चे पोस्टर फाडून बजरंग दल, विहिंपचे आंदोलन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : पठाण सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्यात येत असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि.२५) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त होत धुळे शहरातील दोन चित्रपटगृहाच्या बाहेर लावण्यात आलेले ‘पठाण’चे पोस्टर फाडून हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवू नये, असा इशारा दिला आहे. येणाऱ्या दोन दिवसात चित्रपटाचे प्रदर्शन न रोखल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

धुळे शहरातील अॅडलॅब आणि ज्योती चित्र मंदिरात पठाण चित्रपटाचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने तीव्र विरोध करीत आंदोलनाच्या माध्यमातून तडाखा दिला आहे. या आंदोलनात प्रदीप जाधव, देवेंद्र बडगुजर, जयेश माळी, निखिल पाटील, हेमंत कचवे, रोहित विभांगिक, यशवंत पाटील, महेश पाटील, प्रशांत सैंदाणे, चेतन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या या कार्यकर्त्यांनी ज्योती चित्र मंदिरामध्ये येऊन चित्रपटगृहाच्या बाहेर लावण्यात आलेले पोस्टर फाडून आपला रोष व्यक्त केला. त्याचप्रमाणे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा चित्रपट तातडीने बंद करण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसात हा चित्रपट बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याच प्रकारचे आंदोलन अॅडलॅब चित्रपट गृहाबाहेर करण्यात आले. धुळे शहरातील कोणत्याही चित्रपटगृहात पठाण चित्रपटाचे प्रदर्शन चालू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्यात येत आहे. हिंदू समाजाला लक्ष करून असे चित्रपट बनवले जात आहे. या चित्रपटांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना कधीही माफ केले जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अधिक वाचा :

The post धुळ्यात ‘पठाण’चे पोस्टर फाडून बजरंग दल, विहिंपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version