
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशु बाजारासह गुरांच्या वाहतुकीस अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परवानगी दिली आहे.
धुळे जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्री व प्राण्याचे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली होती. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणताही प्राणी बाजार भरविणे व जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यास अटी व शर्तीच्या अधिन राहुन मान्यता देत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले आहे.
जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता 28 दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झाले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील. संक्रमित/संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक असून ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम 2001 मधील नियम 47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील पशु बाजारामध्ये (कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे) यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुरांची खरेदी विक्री करु नयेत.
या आदेशाची अंमलबजावणी धुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती, अनुषंगीक सर्व प्रशासकीय विभागाने आदेशाचे पालन करावे, असेही शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा :
- नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव
- Nawab Malik : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
- देशात छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे : फडणवीस
The post धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी appeared first on पुढारी.