धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात

धुळे शिवसेनेला धक्का,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा शिवसेनेला धक्का देत विद्यमान महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्यासह दोघा माजी नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचे कार्यक्रम राबवला जात असतानाच आज अचानक शिवसेनेचे विद्यमान महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक संजय वाल्हे तसेच बाळासाहेब आगलावे, उपमहानगर प्रमुख समाधान शेलार, निलेश मराठी यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

यावेळी माजी कृषी मंत्री दादा भुसे, धुळे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री अब्दूल सत्तार, निरीक्षक अनिल भोर, निरीक्षक रेडकर उपस्थित होते. मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मोरे व समर्थक यांनी विश्वास दर्शवत पाठिंबा दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरात काम करा. धुळे शहराच्या विकासासाठी मी तुमच्या पाठिशी आहे असे आश्वासन दिले. यावेळी महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी शिवसेनेत केलेल्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. कार्य अहवाल बघून शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. पाठिंबा देतांना धुळे शहर संघटक तथा माजी नगरसेवक संजय वाल्हे, उपमहानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक बाळासाहेब आगलावे, उपमहानगरप्रमुख समाधान शेलार, उपविभागप्रमुख शेखर बडगुजर, उपविभागप्रमुख निलेश मराठे, सुयोग मोरे उपस्थित होते.

The post धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.