धुळ्यात हद्दपार गुन्हेगाराचा पोलिसावर कोयत्याने हल्ला

पोलिसांना मारहाण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

हद्दपार आरोपीला नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलीसावरच गुन्हेगाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलिस अधिकारी थोडक्यात बचावला असून या संदर्भात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुख्यात गुन्हेगारांना दहा दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. या अंतर्गत देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यातील रोहित सानप या युवकाला हद्दपारीची नोटीस बजावण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे हवालदार मिलिंद सोनवणे तसेच भरत कोष्टी, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार साबळे आणि चव्हाण हे त्याच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी रोहित सानप याने पोलीस पथकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला पोलीस कर्मचारी भरत कोष्टी यांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न करताच रोहित सानप याने त्याच्या हातातील कोयत्याने कोष्टी यांच्या डोक्यावर वार केला. मात्र कोष्टींनी मान बाजूला केल्याने कोयता त्यांच्या हाताच्या दंडाला लागला. या प्रकरणी रोहित याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे.

या हल्ल्याची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी ईश्वर कातकडे यांनी तातडीने जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्याची चौकशी केली. या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

The post धुळ्यात हद्दपार गुन्हेगाराचा पोलिसावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.