नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आमरांनासोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात शिवसेना दुभंगवणारे वादळ उभे केले आणि शिंदे – फडणवीस सरकारची स्थापना झाली. या वादळात देखील स्थिर आणि जैसे थे राहिलेली नंदुरबार जिल्हा शिवसेना आता मात्र, फुटीच्या वाटेवर आली आहे. एक भलीमोठी फळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेली येत्या काही काळात पहायला मिळू शकते.
काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन शिवसेनेत आलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उध्दव ठाकरे यांचे शिवबंधन सोडून देण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्हा शिवसेनेत फुटीचा अर्थ काढला जात आहे. रघुवंशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच्या भेटीचा सिलसिला जारी ठेवला आहे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नंदुरबार येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सोहळा आयोजित करून त्या विकासाचे श्रेय जाहीरपणे मुख्यमंत्री शिंदे यांना देऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रघुवंशी यांनी मेळावा घेऊन एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणारे पत्र पदाधिकार्यांकडून लिहून घेतल्याची चर्चा आहे. दिनांक २० रोजीचा न्यायालयीन निकाल शिंदे सरकारकडून जाहीर होताच त्याविषयीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे बोलले जाते. तसे झाले तर, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला रघुवंशी यांच्यामुळे मिळालेले बळ संपुष्टात येईल. जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि काही ग्रामपंचायती, विकास सोसायट्या आदी स्तरावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मजबूत झालेली दिसेल.
असे असले तरी, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी अजून तरी बाहेर पडलेले नाहीत अथवा त्यांनी राजीनामा दिलेले नाहीत. आम्ही उध्दव साहेबांसोबतच राहू, असे सर्व तालुक्यातील मूळ शिवसैनिक ठासून सांगताहेत. शिवसेना अभंग असून बाहेर पडतील ते फक्त रघुवंशी समर्थकच असतील, असा दावा मूळ शिवसैनिकांकडून केला जातो.
नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी म्हणतात की, मला आमदारकीची संधी उध्दव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली असल्याने मी त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सर्व शिवसैनिक जैसे थे राहणार असून मजबूतीने गड लढवू, असेही ते म्हणाले. आगामी काळात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना तर विधानपरिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेना यांच्यातील लढाई नंदुरबार जिल्ह्यात रंगतांना दिसू शकते की काय? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
#मोठी_बातमी! शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र https://t.co/xuWca4PZnh#Pudhari #pudharionline #pudharinews #Shivsena #ShivSenaMP #loksabha #loksabha_speaker #शिवसेना #शिवसेना_खासदार
— Pudhari (@pudharionline) July 19, 2022
The post नंदुरबारमध्ये शिवसेना दुभंगण्याच्या वाटेवर ? appeared first on पुढारी.