नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार : नंदुरबार नगर परिषदेतील विकास कामांशी संबंधित सात कोटी 28 लाख रुपयांचा प्रलंबित निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी भाषणातून मांडता क्षणी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्य सचिवांना दूरध्वनी करून अवघ्या तीन मिनिटात त्याचा जीआर काढण्याची व्यवस्था केली. गतिमान सरकारची ही प्रचिती देत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी प्रचंड सुखद धक्का दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब शिवसेना पक्षाचे युती सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे. गतिमान सरकार आहे.  याचा हा जाहीर पुरावा देत आहे. नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी हा घटनाक्रम घडला.  मानपत्र आणि सत्कार स्वीकारून यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जिल्हा मेळाव्याला रवाना झाले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांचेही आगमन झाले.

याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी. आर पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

हेही वाचा :

The post नंदुरबार : अन् मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात प्रलंबित सात कोटींचा निधी केला मंजूर appeared first on पुढारी.