नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुधवारी (दि.९) नंदुरबार शहरातून मोर्चा काढण्यात आला. या आदिवासी जन आक्रोश मोर्चाला आदिवासी बांधवांनी रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती दिली. महिला, पुरुषांनी परिधान केलेले काळे पोशाख व दंडावर बांधलेल्या काळ्या फिती जन आक्रोश मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी महासंघ यांच्यासह सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चात पक्षीय भूमिका बाजूला विविध पक्षांतील पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंचासह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. परंतु आज (दि ९ )त्या सर्व कार्यक्रमांना आणि उपक्रमांना फाटा देऊन निषेध दिवस पाळण्यात आला. मणिपूर येथे आदिवासी महिलांवर अत्याचार करण्याची घडलेली घटना, मध्य प्रदेशात आदिवासी तरुणाची विटंबना करण्याचा घडलेला प्रकार तसेच समान नागरी कायदा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निषेध नोंदविण्यासाठी जन आक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातून तरुणांचे जत्थे आणि महिला पुरुषांचे समूह नंदुरबार येथे उपस्थित झाले होते. महाराणा प्रताप चौकातून जिल्हाधिकारी कचेरीवर हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांमुळे शहरातील संपूर्ण रस्ते व्यापले होते. अनेक महिलांनी व पुरुषांनी काळे पोशाख परिधान केले होते तर काही जण दंडाला रिविन बांधून व काळे झेंडे फडकवून निषेध नोंदवताना दिसले.
हेही वाचलंत का?
- सिंधुदुर्ग : गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा; हेवाळे ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन
- विकासाच्या नावावर जिंकणार तर, भाजपला इतरांच्या कुबड्या कशाला : विजय वडेट्टीवार
The post नंदुरबार : आदिवासी जनआक्रोश मोर्चाद्वारे मणिपूर प्रकरणाचा निषेध appeared first on पुढारी.