नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी भव्य सामूहिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात केले.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकाच वेळी राख्या बांधण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सामूहिक रक्षाबंधनाचा भव्य सोहळा आयोजित केला होता. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर पितांबर सरोदे यांनी खासदार डॉक्टर हिना गावित व डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते राखी बांधून घेतली. दोन्ही भगिनींनी नम्रपणे त्यांच्या पायाला नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद दिले, तो क्षण उपस्थित कार्यकर्त्यांना क्षणभर भावनाप्रधान करून गेला.

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, भाजपाचे माजी प्रतोद आनंद माळी, नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, माणिक माळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी, ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच सर्व तालुक्यातील विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती, नगरसेवक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय अथवा पक्षीय भेद न करता एकाच वेळी शेकडो जणांना राखी बांधण्याचा असा सामूहिक भव्य सोहळा नंदुरबारच्या राजकीय इतिहासात प्रथमच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित प्रत्येकाला राखी बांधून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समावेत व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य अॅड. उमा चौधरी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सविता जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.