नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतराची शक्यता?

जिल्हा परिषद नंदुरबार

नंदुरबार- येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची अडीच वर्षांची मुदत संपल्यामुळे आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा या पदासाठी निवड होत असून सत्तांतर घडते की महाविकास आघाडीची सत्ता कायम राहते याचा उलगडा दुपारी तीन वाजता होणाऱ्या विशेष सभेतून होणार आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेची ही विशेष सभा होण्याआधी सकाळी 11 वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता स्थापन होते, दिवाळीआधी फटाके कुणाचे फुटतात याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे काही सदस्य भाजपसोबत गेल्याची चर्चा रविवारी दिवसभर होती. त्यामुळे आज विशेष सभेच्या आधी घडणाऱ्या घडामोडींकडेही त्यांचे लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपला सत्तेत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट दिसत आहे. भाजपचे २० व राष्ट्रवादीच्या शरद गावीत गटाचे 3 असे २३ सदस्य भाजपाकडे आधीपासून होते. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत विजय मिळवण्यासाठी त्यांना आणखी 6 सदस्य जुळवणे आवश्यक असून तेवढे संख्याबळ ते जुळवू शकतात का हे दुपारी पाहायला मिळेल.

या उलट काँग्रेसकडे काँग्रेसचे २४ व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे म्हणजे चंद्रकांत रघुवंशी यांचे 7, राष्ट्रवादीच्या अभिजित मोरे गटाचा एक असे ३२ सदस्य असल्याने या तिन्ही पक्षांच्या आघाडीची बाजू पहिल्या अडीच वर्षात मजबूत होती. तथापि यांच्यातील एकतेला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे त्याचा परिणाम दुपारच्या सभेत दिसेल का? हे बघण्यासारखे राहणार आहे.

विद्यमान स्थितीत काँग्रेसच्या अॅड. स्मिता वाळवी अध्यक्ष तर उपाध्यक्ष शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी आहेत. या दोघांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तथापि यांना पदावर कायम ठेवून पुढे चालावे असे मत शिंदे गटाच्या शिवसेनेचे आहे. पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न चालवल्यामुळे भाजपा विरुद्ध शिंदे गट व दोन्ही काँग्रेस अशी विभागणी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही विशेष आदेश आल्यास येथील सदस्य पळवा पळवी च्या खेळीला पूर्णविराम मिळू शकतो व एकतर शिंदे गट व भाजपा युती झालेली दिसेल किंवा महाविकास आघाडी सत्ता तशीच अबाधित दिसेल असा जाणकारांचा अंदाज आहे. दुपारची विशेष सभा याच अर्थाने लक्षवेधी बनली आहे.

असे आहे बलाबल….

काँग्रेस: २४

भाजप : २०

| शिवसेना (बाळासाहेब उबाठा) : ८

राष्ट्रवादी : ४

एकूण: ५६

बहुमतासाठी सदस्य संख्या : २९

हेही वाचा :

The post नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतराची शक्यता? appeared first on पुढारी.