
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
मणिपूर मधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदायाने आज (दि. २६) पुकारलेल्या जिल्हा बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्याचे दिसून आले. शहादा आणि रनाळा येथे बसवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मात्र ग्रामीण भागातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील समस्त व्यापारी संघटना विक्रेते आणि व्यावसायिकांसह नागरिकांनी सुद्धा समस्त महिलांच्या सन्मानाचा प्रश्न म्हणून सहभागी व्हावे; असे आवाहन समस्त आदिवासी समुदायाच्या वतीने विविध संघटनांनी एकत्रितपणे केले होते. या आंदोलनानिमित्त सर्व आदिवासी संघटना एकवटल्या. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस यासह सर्व राजकीय पक्षांनी तसेच व्यावसायिकांच्या व व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांनी विक्रेत्यांनी बंद पाळून प्रतिसाद दिला. शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवून खाजगी शिक्षण संस्था चालकांनी देखील सहभाग घेतला.
परिणामी नंदुरबारसह सर्वप्रमुख शहरांमधील आणि गावांमधील बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या. नंदुरबार शहरातील मंगळ बाजार नगरपालिका परिसर गांधी चौक नेहरू चौक सिंधी कॉलनी सह सर्व परिसरातील व्यवहार ठप्प झाले. विसरवाडी खांडबारा नवापूर येथील बाजारपेठ, धडगाव तळोदा शहादा अक्कलकुवा या तालुक्यातील बाजारपेठांमध्ये सामसूम दिसली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तांबे, उपअधीक्षक महाजन, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरण खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे बंदोबस्त हाताळत आहेत.
तथापि शहादा तालुक्यातील पाडळदा येथे एका बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली. त्यापाठोपाठ दरा फाट्यावरील एका हॉटेल येथील सामानाची नासधूस करण्यात आली. तर नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे सुद्धा एका बसवर दगड फेक करण्यात आली. या घटनांमुळे शांततेत चाललेल्या बंद आंदोलनाला गालबोट लागले. या घटनांची दखल घेऊन निकम यांनी शहादा येथे जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नंदुरबार येथील आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले की दगडफेकीच्या घटना लक्षात घेऊन नंदुरबार तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व बसेसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची उपस्थिती तुरळक दिसली तथापि लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या नियमितपणे चालू ठेवण्यात आल्या होत्या. मोठा कोणताही अनुचित प्रकार दुपारपर्यंत घडला नाही.
हेही वाचा :
- नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
- Sanjay Kumar Mishra : ‘ईडी’ प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ द्या, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका
- ChatGPT Android App : चॅटजीपीटीचं अँड्रॉईड अॅप भारतात लॉंच; जाणून घ्या कसं करता येईल डाऊनलोड
The post नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद ; बसवरील दगडफेकीने गालबोट appeared first on पुढारी.