नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड

नंदुरबार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; आदिवासी सहकारी साखर कारखान्यातील अन्यायाचे दिवस संपले असून आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हक्काचे दिवस सुरू झाले आहेत. ऊस उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी साखर उत्पादन इंधन उत्पादन या संबंधित तसेच विविध प्रकारचे अनुदान मिळवण्यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास खात्याकडून तसेच केंद्र सरकारच्या सहकार विभागातून पुरेपूर सहकार्य मिळवून दिले जाईल अशा शब्दात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांनी आज (दि.४) आश्वासन दिले.

आज दि ४ डिसेंबर २०२३ रोजी ११ ते २ या वेळेत नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदी भरत माणिकराव गावित यांची तर उपाध्यक्षपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख भाषणात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शेतकरी हिताविरोधात राबवल्या गेलेल्या कारभारातून कारखान्याची मुक्तता व्हावी आणि आदिवासी ऊस उत्पादकांना त्यांचा खरा हक्क मिळवून द्यावा हा प्रयत्नपूर्वीपासूनच होता असे स्पष्ट केले.

फक्त आदिवासी सहकारी कारखान्यालाच नाही तर जिल्ह्यातील इतर सहकारी कारखान्यांना देखील आपण कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. यापुढे देखील शेतकरी हिताच्या कामावर आपला भर राहील कारखान्याला पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले. खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित शहा यांनी स्वतः येथील परिवर्तनाची दखल घेतली असून त्यांच्या माध्यमातून कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. इथेनॉल निर्मिती सारखे प्रकल्प असो की साखर उत्पादन वाढी संदर्भातील उपाययोजना असो केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहकार्य मिळवता येईल ऊस उत्पादकांच्या खात्यात सरळ रक्कम जमा होईलत. असे उपाय केंद्र सरकारनेच केलेले आहेत. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादकांच्या प्रगतीसाठी वेगाने काम करणे आता निश्चितच शक्य होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला शुभेच्छा देत कारखाना कार्यक्षेत्रातील पाणी योजना व कृषी योजना राबवण्यावर भर राहील असे सांगितले. माजी आमदार शरद गावित यांनी आपल्या खुमासदार भाषणातून मागील काही वर्षात कारखान्याच्या माध्यमातून केल्या गेलेल्या कारभारावरचा खरपूस समाचार घेतला आणि मोठे राजकीय परिवर्तन बाकी आहे अशा शब्दात भाष्य केले.

नुतन अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी मान्यवरांसह सर्व उपस्थितांचे आभार मानत भावूक भाषण केले. मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वावर आमचा सर्वांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. यांच्याशिवाय आम्हाला हे परिवर्तन घडवणे शक्य नव्हते. तथापि, जनसमुदायाच्या हिताचे राजकारण करीत नामदार डॉ. गावित यांनी आम्हाला शक्ती पुरवली. आता यापुढे ऊस उत्पादकांच्या हक्काचा कारखाना चालवला जाईल असे भरत गावित म्हणाले. माजी आमदार निर्मला गावित उपाध्यक्ष जगन कोकणी यांनी भाषणातून मतदारांचे आभार मानले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण ण सभापती संगीता गावित बकाराम गावित सिताराम ठाकरे आलो दादा गावित रमेश गावित रूद्रा वसावे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा;

The post नंदुरबार : नवापूर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भरत गावित यांची बिनविरोध निवड appeared first on पुढारी.