नंदुरबार : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून आरोपी फरार

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : आरोपीला येथील न्यायालयात सोमवारी (दि.९) दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत बसून फरार झाला. यामुळे शहादा न्यायालय आवारात एकच खळबळ उडाली. शहादा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २०२२ च्या गुन्ह्यातील हा आरोपी आहे. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग केला. परंतु, डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने सुसाट निघालेल्या स्कार्पिओने एका इसमास धडक देऊन फरार झाली. यावेळी पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, आरोपी व संबंधित गाडी अद्यापही मिळवून आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा पोलीस ठाण्यात अटकेत असलेला ओम प्रकाश उर्फ ओम आराम किसनराव जाट (वय २५) हा आरोपी राजस्थान राज्यातील असून सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. राजस्थानमध्येही संबंधीतावर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस शहादा पोलिसांनी पकडून आणले होते. त्याला तीन दिवसांपूर्वी शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज सोमवारी पुन्हा न्यायालयात संबंधित आरोपीला पोलीस ठाण्यातून बेड्या घालून हजर केले होते. परंतु विश्रांतीसाठी सदर आरोपी न्यायालयाबाहेर कट्ट्यावर बसला होता. यावेळी एक अनोळखी इसम संबंधित आरोपी जवळ येऊन हितगुज केली. नंतर नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी न्यायालयाचा आवारात आली. त्याचवेळी संबंधित पोलिसाला हिसका देऊन आरोपीने स्कार्पिओ गाडीत प्रवेश केला.

संबंधित गाडीच्या चालकाने गाडी डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने भरधाव वेगाने नेली. यावेळी शहरातील गोविंद नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक सुरेश कांजी चौधरी हे ओम एक्सीडेंट हॉस्पिटल लगत उभे असताना त्यांना या स्कार्पिओने जोरदार धडक दिली यात ते जखमी झालेत. रस्त्यावरही भरधाव वेगाने जात असताना अनेकांनी पाहिले. शहादा पोलिसांनी तात्काळ म्हसावद, दरा फाटा तसेच विविध ठिकाणी बंदोबस्त लावला परंतु अद्याप पर्यंत आरोपी मिळून आला नाही.

हेही वाचलंत का?

The post नंदुरबार : पोलिसांना हिसका देऊन शहादा न्यायालयातून आरोपी फरार appeared first on पुढारी.