Site icon

नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले असून प्रकाशा येथे पोलीसांनी आणखी एक बालविवाह रोखला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मिळालेल्या गोपनीयस माहितीवरून जिल्हा स्तरावरील अक्षता समितीचे सदस्या नयना देवरे, सहायक पोलीस निरीक्षक, महिला सेल, नंदुरबार यांना बालविवाहाबाबत माहिती कळवली. त्यानुसार पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत हा बालविवाह थांबवून समुपदेशन  करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण पथकाने तपास केला असता या समितीला प्रकाशा येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. नवसारी येथील मुलीबाबत विचारपूस केली असता वधू मुलगी विवाहवेळी प्रकाशा येथे येणार असता मुलीच्या जन्मतारखेबाबत विचारपूस करण्यात आली. तर मुलीचे वय अवघे 16 वर्ष 8 महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने वधू मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत फोनद्वारे संपर्क साधला. बालविवाहामुळे अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समुपदेशन करून बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई करण्यात येते. याबाबत माहिती दिली. वधू-वर पक्षाचे मनपरिवर्तन करण्यात आले. तसेच वधू मुलास व त्याच्या नातेवाईकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना समजावून सांगण्यात आल्यानंतर त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली आहे. बालविवाह रोखण्यासाठी प्रकाशा येथे गेलेल्या अक्षता समितीकडून उपस्थित नागरिकांना व ग्रामस्थांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाहाविषयी जनजागृती करण्याचे काम ऑपरेशन अक्षता समितीकडून वेळोवेळी केले जात आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले आहे ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल.– पी. आर. पाटील,  नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक.

“ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यंदा 8 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला असून आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतीचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. ही कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्यासह जिल्हा स्तरीय वालविवाह समिती, महिला सेल नंदुरबार, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार नेमणूकीचे पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, शहादा पोलीस ठाणे नेमणूकीचे पोलीस हवालदार मेहरसिंग वळवी, पोलीस अंमलदार कृष्णा जाधव यांनी केली.

हेही वाचा:

The post नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Exit mobile version