
नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : घर फोडीकरून सुमारे आठ लाख रुपयांहून अधिक रकमेचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना आज (दि.४) पहाटे घडली. घरफोडी करण्याचा कट भाडेकरूनेच रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणाचा अवघ्या आठ तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २ मे २०२३ ते ४ मे २०२३ रोजी पहाटे शेख युसुफ शेख चांद (वय ५३ वर्षे रा. प्लॉट नंबर-११५ पटेलवाडी, नंदुरबार) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने घरातील कपाटामधून ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाणे आज दि. ४ रोजी नोंदविण्यात आला होता.
याप्रकरणी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक, निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी शेख युसुफ शेख चांद यांचे घरात घर भाडेकरु म्हणून ३ वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहायाने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रण सतर्क झाली.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेश दिले.
जुबेर शहा यांचे घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा हा त्याच्या घरात चोरी झाल्याचा बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन जुबेर शहा यास सखोल विचारपूस करण्याचे आदेश दिले. या पथकाने हिसका दाखवताच त्याने चोरी केलेला ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याकडून मिळवले. सदर मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला.
सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनात कौशल्यपूर्वक तपास व अनुभवाची सांगड घालून घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
हेही वाचा;
- Honey Trap : पुण्यातील अधिकारी पाकिस्तानी ISIच्या हनी ट्रॅप जाळ्यात? ATS कडून गुन्हा दाखल, गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय
- Nana Patole : शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणात गरज;नाना पटोले
- बारसूनंतर चंद्रपूर येथील सिमेंट कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाला नागरिकांचा तिव्र विरोध
The post नंदुरबार : भाडेकरूनेच रचला मालकाच्या घरफोडीचा बनाव appeared first on पुढारी.