नंदुरबार शहरात कोबिंग ऑपरेशन; ८०० वाहनांची तपासणी

Nandurbar police

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा: आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा, तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत, यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबिंग, नाकाबंदी केली. यादरम्यान, फरार आरोपी, घातक शस्त्र बाळगणारे संशयित यांच्यासह काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तसेच नाकाबंदी करून ८०० वाहनांची तपासणी करण्याची धडक कारवाई केली. रविवारी (दि. १६) सायंकाळी ६ पासून ते सोमवारी (दि.१७) सकाळी ६ पर्यंत ही कारवाई  (Nandurbar News) करण्यात आली.

संपूर्ण ऑल आऊटचे नेतृत्व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील १८ अधिकारी व १२२ अंमलदार नेमण्यात आले होते. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देण्यात आल्या. नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दो शाह तकिया आदी परिसरात रुट मार्च करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 5 गुन्ह्यात सन 2021 पासून पाहिजे असलेला आरोपी प्रदिप शिवलाल ऊर्फ शिवल्या पावरा (वय 21 रा. ब्राम्हणपूरी ता. शहादा) याला पकडण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील 7 आरोपींविरुध्द् आणि अन्य 5 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी एकूण 26 नॉन बेलेबल वॉरंट व 44 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच 37 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले. नाकाबंदी दरम्यान 497 लहान व 288 मोठे असे एकूण 785 वाहनांची कसून तपासणी करण्यात (Nandurbar News)  आली.

ही कारवाई नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमलदार यांनी केली.

हेही वाचा 

The post नंदुरबार शहरात कोबिंग ऑपरेशन; ८०० वाहनांची तपासणी appeared first on पुढारी.