नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

शॉक लागून महिलेचा मृत्यू,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीचा जबर धक्का बसून लागवडीचे काम करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दूर्घटना आक्राळे ता. नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नंदुरबार तालुका पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई भाईसिंग भिल (वय ५५ वर्ष) रा. आक्राळे ता. नंदुरबार या आक्राळे गावातील शेतकरी कन्हैयालाल धनगर यांच्या शेतात कापूस पिकाच्या सरक्या लावण्याचे काम करीत होत्या. त्यावेळी विद्युत वाहिनीच्या तारा जमिनीवर पडलेल्या होत्या आणि त्यांना ते लक्षात आले नाही. अशातच अनावधानाने त्या तारांचा स्पर्श होताच विजेचा जबर धक्का बसून ताराबाई कोसळल्या. इतरांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

याप्रकरणी जयसिंग भाईसिंग भिल रा. आक्राळे ता. नंदुरबार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात खबर दिल्यानुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक गुलाब तेले करीत आहेत.

हेही वाचा :

The post नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.