नंदुरबार : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुभानाथ शेतानाथ मदारी (वय 52, रा. स्टेशन रोड, हलोल, जि. पंचमहल (गोध्रा), धिरूनाथ सरकारनाथ मदारी (वय 25, रा. तय्यबपूरा कपडगंज, जि. खेडा), विक्रम कालू परमार (वय 25, रा. कतवारा, ता. जि. दाहोद (गुजरात) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील बस स्थानक ते भाजीपाला मार्केट परिसरात 2 ते 3 बहुरुपी साधू महाराज  लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने वाहनातून परिसरात फिरत असल्याची माहिती  नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून एक पथक तयार करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर  स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाला  महाराणा प्रताप पुतळयाजवळ  2 ते 3 साधू संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले. त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. त्यामुळे ते खरोखरचे साधू नसल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांच्या  वाहनाची झडती घेतली असता वाहनात बहुरूपी साधू बनण्यासाठीचे साहित्य मिळून आले. 111 खोटे रुद्राक्ष, चंदनाचा लेप असलेली ढबी, विविध प्रकारच्या रंगाचे खडे, रुद्राक्ष माळ, साधू महाराज बनण्यासाठी लागणारे कपडे, कापूर, मोबाईल, रोख रुपये व एक चारचाकी वाहन असा एकूण 5 लाख 24 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश येलवे, पोलीस नाईक बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, पोलीस अंमलदार अनिल बड़े, प्रवीण वसावे यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का ? 

The post नंदुरबार : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद appeared first on पुढारी.