Site icon

नंदुरबार : ३१ डिसेंबरची पार्टी महागात; जिल्ह्यात १४१ मद्यपींवर गुन्हे दाखल

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा मद्यपी वाहन चालकांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीसांनी धडक मोहीम राबवून दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत १४१ गुन्हे दाखल केले.

दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत दारु पिऊन वाहन चालविताना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. लवकरच त्यांचे परवाने (लायसन्स) रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यां विरोधात दि. ३० व ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात आली होती. यातील दोषींवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान १४१ वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले.

नंदुरबार शहर पोलीस ठाणे- ०५, उपनगर पोलीस ठाणे-२३, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- ०८, नवापूर पोलीस ठाणे- १४, विसरवाडी पोलीस ठाणे-१०, धडगांव पोलीस ठाणे-०५, म्हसावद पोलीस ठाणे- ०५, सारंगखेडा पोलीस ठाणे-०६, अक्कलकुवा पोलीस ठाणे-११, तळोदा पोलीस ठाणे-०८, मोलगी पोलीस ठाणे-०३ व शहर वाहतूक शाखा २४ गुन्हे असे एकुण १४१ गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जानेवारी २० ते डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या ३९१ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ३५८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

दारु पिऊन वाहन चालविणारांना कारवाई चालूच राहणार : पोलीस अधीक्षक यांचे आवाहन

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

The post नंदुरबार : ३१ डिसेंबरची पार्टी महागात; जिल्ह्यात १४१ मद्यपींवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version