Site icon

नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक

नंदुरबार : कार्यारंभ आदेश देण्याच्या आणि प्रलंबित बिल काढून देण्याच्या मोबदल्यात सुमारे 43 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.

नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून 3 मार्च रोजी पहाटेपर्यंत कारवाई चालू होती. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा जि. नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता (वर्ग – १) महेश प्रतापराव पाटील, वय ५१ वर्ष, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ते मूळ नाशिक येथील. फ्लॅट २०३, अष्टविनायक टाॅवर, थत्ते नगर, गंगापूर रोड येथील रहिवासी आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खैरवे ता. शहादा, जि. नंदुरबार येथील रहिवासी असून शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मागील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा या कार्यालयात आले आहेत. परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश आज रोजीपावतो तक्रारदार यांना मिळालेले नाहीत.

तक्रारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची तीन कोटी 92 लाख 79 हजार 285 रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे पाच कोटी 33 लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळणे कामी महेश पाटील यांच्याकडे तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व अनेक वेळा विनंती केली. परंतु पाटील यांनी बिलाची रक्कम मंजूर केली नाही. तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. यानंतर तक्रारदार यांनी पाटील यांना विनंती व पाठपुरावा केला असता तक्रारदर यांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी एकत्रित 43 लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.

मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई 

पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राकेश आ. चौधरी, पो.नि. समाधान एम. वाघ, पो.नि. माधवी एस. वाघ, विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर व जितेंद्र महाले यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : 

The post नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version