नऊ दिवसांच्या बाजार बंदने कांदादर घसरण्याची भीती; शेतकऱ्यांचा संताप

मालेगाव (जि. नाशिक) : होळी, धूलिवंदन, मार्चएंड व रंगपंचमी आदी करणे पुढे करत जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव तब्बल नऊ दिवस बंद आहेत. बेमोसमी पावसाने झालेले नुकसान, कोरोना व बाजार बंद अशा विचित्र परिस्थितीत बळीराजा सापडला आहे. सलग नऊ दिवस बाजार बंद ठेवताना शेतकऱ्यांचा कोणीही विचार केला नाही. बाजार सुरू होताच आवक वाढून भाव घसरण्याची भीती आहे. मका, द्राक्षे, डाळिंब, कडधान्य आदींचे व्यवहार सुरळीत सुरू असतानाच कांद्याबाबतच दुजाभाव का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी कांदा उत्पादकांच्या भावना लक्षात घेऊन बाजार लवकर कसा सुरू होईल, याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. 

कसमादेसह जिल्ह्यातील बहुतांशी बाजारांत २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. कसमादेसह जिल्ह्यात या वर्षी लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची धूम आहे. अनेक ठिकाणी कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या वर्षीही बेमोसमी पावसाचा फटका बसला होता. त्यात कोरोनाची भर पडली. लॉकडाउनमुळे शेतमाल मातीमोल विकला गेला. अनंत अडचणींवर मात करत बळीराजाने लॉकडाउनमध्ये सामान्यांना फळे, भाजीपाला, दूध, धान्य पुरविले. या वर्षी चांगल्या पावसाने लाल व उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाले. तसेच उन्हाळ कांद्याचे रोप शेतातच सडले. जिगरबाज शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत उन्हाळ कांद्याची लागवड केली. जानेवारीतील पावसामुळे रांगड्या कांद्याला फटका बसला. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

शेतकऱ्यांमध्ये संताप

कांद्याचे पीक बऱ्यापैकी जोमात दिसू लागताच गेल्या आठवड्यात कसमादेत झालेला बेमोसमी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले. संपूर्ण कसमादे पट्ट्यात १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याला करपा रोगाने कवेत घेतले. शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात केली असतानाच कोरोना व बेमोसमी पावसाने धास्तावलेल्या बळीराजाला बाजार बंदचा शॉक बसला. बेमोसमी पावसाने ओल्या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. एवढे दिवस बाजार बंद ठेवताना पणन विभाग व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

मका, कडधान्य व फळ बाजार सुरू आहेत. शिवार खरेदी केली जात आहे. फक्त कांदा बाजारच बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. नऊ दिवसांनंतर बाजार सुरू होताच आवक वाढेल. मागणी आणि पुरवठा यांचे गणित बिघडून कांदा मातीमोल विकावा लागेल. याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल. पणन विभाग व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन बाजार समित्यांमधील कांदा लिलाव तत्काळ सुरू करावेत. 
-कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना