नगसेविकेनेच लिहिले भिंतीवर गाऱ्हाणे! महापालिकेतील सत्तारूढ कॉंग्रेस-शिवसेनेला घरचा अहेर 

मालेगाव (जि. नाशिक) : येथील कॅम्प भागातील नागरी सुविधांबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने वैतागलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिभा पवार यांनी प्रभाग एकच्या भिंतीवर प्रभागातील समस्या लिहून महापालिकेतील सत्तारूढ कॉंग्रेस-शिवसेना आघाडीला घरचा आहेर दिला आहे. 

नागरी समस्यांबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता या प्रकारावरून चव्हाट्यावर आली आहे. शहरात नागरी सुविधांचा नेहमीच बोजवारा उडलेला असतो. प्रत्येक महासभेत रस्ते, गटार, पाणी, अस्वच्छता हे प्रश्‍न चर्चिले जातात. तसेच विविध पक्ष संघटना यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलने करतात. नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. नगरसेविका पवार यांनी वारंवार नागरी प्रश्‍नांबाबत आयुक्त व प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रभाग समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित केले. समस्या सुटत नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी त्या चक्क भिंतीवर लिहिण्याचा फंडा अवलंबिला. नागरी समस्यांबाबत प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे लोकप्रतिनिधींनी समस्याच भिंतीवर लिहिण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नगरसेवकांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

समस्यांचा पाढा 

प्रभागात गटारी स्वच्छ होत नाही, घंटागाडी वेळेवर येत नाही, पिण्याचे पाणी अनियमित येते, आदर्शनगरमध्ये चार वर्षांपासून पाणी येत नाही आदी मागण्या त्यांनी चक्क भिंतीवर लिहिल्या. शहरात आजही ठिकठिकाणी गटारी तुंबल्या असून घाणीचे ढिगारे पडले आहेत. कोरोना वाढत असतानाही शहरात स्वच्छतेला प्राधान्य दिले जात नाही, याबाबत येथे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पदाधिकारी व अधिकारी भिंतीवरील मागण्या वाचून कॅम्पवासीयांना न्याय देतील, अशी त्यांना आशा आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!