नदीपात्रातून निघतयं चक्क लोखंड; जीव धोक्यात घालत उसळली गर्दुल्ल्यांची गर्दी

पंचवटी (नाशिक) : गोदानदीपात्रातील खंडेराव कुंडात सध्या खोदकाम सुरू आहे. यातून लोखंड निघत असल्याने ते गोळा करण्यासाठी चिमुरड्यांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यात गर्दुल्ल्यांची संख्या मोठी आहे. 

चिमुरड्यांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांची मोठी गर्दी 

गोदापात्रातील काँक्रिटीकरणाचा थर काढण्याचे काम सुरू असून, त्यात, सापडणारे स्टील गोळा करण्यासाठी भिकारी, मद्यपी गर्दुल्ल्यांची गर्दी उसळली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदापात्रातील प्राचीन कुंडे तोडून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरण करण्यात आले. काँक्रिटीकरणामुळे गोदावरीचे जलस्रोत गाडले गेल्याने पर्यावरणप्रेमींनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आक्षेप नोंदविला. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार, अस्तरीकरण काढण्याचे काम सुरू आहे. सध्या खंडेराव कुंडात खोदकाम सुरू आहे. यातून लोखंड निघत असल्याने ते गोळा करण्यासाठी चिमुरड्यांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यात गर्दुल्ल्यांची संख्या मोठी आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

गर्दुल्ले, व्यसनींची उपस्थिती 
नदीपात्रातील या कामावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सुपरवायझरची नेमणूक केल्याचे सांगण्यात आले. परंतु आज खंडेराव कुंडातील लोखंड गोळा करण्यासाठी गंगाघाटावरील व्यसनी, गर्दुल्ले मोठ्या प्रमाणावर जीव धोक्यात घालत लोखंड वेचत असताना या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे येथे दुर्घटना झाल्यास कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

 

काळजी घेणे गरजेचे
नदीपात्रातील कामावेळी होणाऱ्या गर्दीविषयी संबंधित ठेकेदाराला कल्पना देण्यात आली आहे. याबाबत संबंधितांनी कामावेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. -प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी