नदीपात्रात गाळात अडकून दोन बिबट्यांचा मृत्यू; नांदूरमध्यमेश्‍वर परिसरातील घटना

खेडलेझुंगे (नाशिक) : गोदावरी नदीपात्रातील गाळात अडकल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदूरमध्यमेश्‍वर शिवारात सोमवारी (ता. १८) सकाळी समोर आला आहे. या दोन्ही बिबट्यांना तारूखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत दहन करण्यात आले आहे.

फुफुसामध्ये पाणी गेल्याने सोडला जीव
 
नांदूरमध्यमेश्‍वर येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. रविवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास दोन बिबटे भक्ष्याच्या शोधात नदीपात्रात गेले असावेत व ते पाण्यातील गाळात अडकून बाहेर पडण्याच्या नादात नाका-तोंडात पाणी शिरल्याने त्यांचा जागेवरच पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. नांदूरमध्यमेश्‍वरच्या पोलिसपाटलांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार मनमाडचे सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांच्यासह येवला वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोचले. त्यानंतर दोन्ही मृत बिबट्यांना बाहेर काढण्यात आले. मृत बिबट्यांपैकी एक अंदाजे चार वर्षे वयाची मादी व दुसरे अंदाजे दीड वर्षे वयाचा नर असून, त्यांना तारुखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत नेण्यात आले. तेथे नैताळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे यांनी शवविच्छेदन केले. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

दोन्ही बिबट्यांचे सर्व अवयव शाबूत असून, फुफुसामध्ये पाणी गेल्याने दोघा बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दोन्ही बिबट्यांचे मृतदेह तारुखेडले येथेच दहन करण्यात आले. या संपूर्ण कार्यवाहीत नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री. वाघ, वनरक्षक श्री. महाले, भय्या शेख आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना