नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या अमृत महोत्सवाच्या अमृत काळात घेतलेला हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे. केवळ महाराष्ट्रातील नद्यांची नाही तर देशभरातील नद्यांची परिस्थिती सद्या बिकट झाली आहे. हा उपक्रम शासनासाठी नाही तर तुमच्या आमच्या जीवनासाठी आहे. त्यामुळे यात सर्व घटकांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून शाळेतील विद्यार्थ्यांपासून जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाराष्ट्र शासन, जलबिरादरी व गंगागिरी संवर्धन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाअंतर्गत अगस्ती व मोती नदी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला तालुक्यातील कुसमाडी येथून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अभिनेता चिन्मय उदगीरकर, प्रांतअधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, वनमित्र दत्तात्रय ढगे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते, प्रा.अर्जुन कोकाटे, दत्ता मोरे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, जलप्रहरी मनोज साठे, वनपाल अक्षय मेहेत्रे, डॉ. उमेश काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानातील वाळवंटात जलसंधारणाचे काम केलं असून याठिकाणी नंदनवन उभे राहीले आहे. अरवली नदीचे पुनर्जीवन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना मॅगसेसेसह अनेक महत्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झाले असून डॉ.राजेंद्र सिंह हे केवळ देशाचे नाही तर जगाचे जलतज्ञ बनले आहे. अशा शब्दात छगन भुजबळ  यांनी गौरोद्गार काढले.

ते म्हणाले की, गोदावरीत स्नानासाठी जगभरातून भाविक येतात. तिचे पाणी घेऊन जातात. त्या नदीची अवस्था आता अतिशय बिकट झाली असून आपला जीव तुटतोय नाशिकच्या प्रतिमेला तडा जात असून ती अद्यापही स्वच्छ होत नाही ही गंभीर बाब आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, वारेमाप होणारी वृक्षतोड आणि हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांचे भविष्य चांगलं करायचे असेल तर आपणच आपल्या नद्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असून होणारे प्रदूषण रोखले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने जनजागृती करण्याच्या दृष्टीने ‘मी गोदावरी बोलते’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा :

The post नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.