‘नमामि गोदा’ पूररेषेतील प्रस्तावित बांधकामे अडचणीत

नाशिक : आसिफ सय्यद

उत्तर प्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी हाती घेण्यात येणाऱ्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला पूररेषेची बाधा झाली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कामांमुळे पूररेषेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होण्याच्या शक्यतेने संपूर्ण योजनेचा आराखडाच बदलण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. प्रशासनामार्फत आता या प्रकल्पाची फेररचना केली जात असून, त्यावर सर्व विभागांच्या सूचनांचा अंतर्भाव करून सुधारीत आराखडा जूनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. २७८० कोटींच्या या योजनेला केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाने तत्वतः मान्यता देताना १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा यापूर्वीच आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मलनिसारण केंद्रांची क्षमता वाढ व आधुनिकीकरण तसेच मल जलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव देखील महापालिकेने शासनाला सादर केला होता. हे दोन्ही प्रस्ताव एकत्रित करून सुधारीत आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त केलेल्या अलमण्डस‌् ग्लोबल सिक्युरिटीज कंपनी या सल्लागार संस्थेने नमामि गोदाप्रकल्पांतर्गत गोदाघाट विकासाचा प्रारूप आराखडा दोन महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्यात जवळपास ५७ कोटींच्या बांधकाम विषयक कामांचा समावेश करताना अस्तित्वातील मलनिसारण केंद्रांची क्षमता वाढ अंतर्भूत केली. तसेच पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनेही प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या कामांमुळे पूररेषेचा भंग होण्याचा आक्षेप पुढे आल्याने आता संपूर्ण प्रकल्पाचीच फेररचना करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. या प्रकल्पांतर्गत बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा आदी विविध विभागांशी संबंधित कामे असल्याने सर्व विभागांच्या सूचनांचा अंतर्भाव करून सुधारीत आराखडा तयार केला जात आहे.

असा आहे ‘नमामि गोदा’ प्रकल्प

  • नवशा गणपती येथे घाट विकास, पार्किंग सुविधा
  • सोमेश्वर धबधबा ते सोमेश्वर मंदिर दरम्यान रोप-वे
  • गोदाघाटाची पुनर्बांधणी करून मनोरंजनस्थळांची निर्मिती
  • तपोवनात लक्ष्मण झुला येथे नवीन पूल, ‘लेझर शो’
  • स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे नूतनीकरण
  • नदी पलीकडे कुसुमाग्रज उद्यानात पोहोचण्यासाठी बोट व्यवस्था

मलनिस्सारण प्रकल्पांची क्षमतावाढ

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाईनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.

छाननी समितीच अडचणीत

‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत केली होती. परंतु, वंजारी हे ३० मे अखेर सेवानिवृत्त होत असल्यामुळे ही समितीच अडचणीत आली आहे. या समितीत अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा व मलनिस्सारण) संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) अविनाश धनाईत हे सहअध्यक्ष तर बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सल्लागार कंपनीमार्फत सादर केल्या सुधारीत आराखड्यासह विविध कागदपत्रांची छाननी करून मंजुरीसाठी सादर करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत प्रस्तावित काही कामे पूररेषेत येत असल्यामुळे सुधारीत आराखडा तयार केला जात आहे. विविध विभागांच्या सूचनांचा अंतर्भाव करून सुधारीत आराखडा जूनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेने शासनाच्या पुढील मंजुरीसाठी सादर केला जाईल. – संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, मनपा.

असा होणार खर्च…

  • केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्यावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरण करणे- ३९८.१८ कोटी.
  • जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे- ९२७.३४ कोटी.
  • नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी- ६२२.०९ कोटी.
  • नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.

हेही वाचा: