Site icon

नरहरी झिरवाळ : जादा दरामुळे ‘कादवा’ उत्तर महाराष्ट्रात आदर्श

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
साखर उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे व त्यांच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीने काम करत कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी काढले.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी झिरवाळ बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक सयाजी गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, चेअरमन श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते व संचालक मंडळ आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी सौ. व श्री. विलास कड, सौ. व श्री. राजाराम भालेराव, सौ. व श्री. भरत देशमुख, सौ. व श्री. रामदास मातेरे, सौ. व श्री. परीक्षित देशमुख, सौ. व श्री. नारायण पालखेडे यांच्या हस्ते गव्हाण पूजन झाले.

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष-भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत असताना ऊस शाश्वत पीक झाले आहे. मतदारसंघात पाण्याचे विविध साठे निर्माण करीत विजेची उपलब्धता वाढविण्याचे काम सुरू आहे. असे सांगत, शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन झिरवाळ यांनी केले. त्यांनी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर असून, सर्व कामे सुरू होतील. जी कामे पावसाळ्यात खराब झाली, ती पुन्हा करून घेतली जातील. सर्वांनी चांगले काम करून घेण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविकात, कादवाने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भावाची परंपरा कायम राखली आहे. यंदा ऊसतोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून, सुमारे पाच लाख मे. टन उस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊसतोड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने इथेनॉलला प्रोत्साहन दिले असून, कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून, त्याचा लाभ शेतकर्‍यांना निश्चित होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्याबद्दल आभार मानत, अजून ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून, संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याचे सांगितले.

देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, नितीन ठाकरे, रवींद्र पगार, गणपतराव पाटील, दत्तात्रेय पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, राजाराम बस्ते, राजू ढगे, युनियन अध्यक्ष भगवान जाधव आदींसह सर्व संचालक, अधिकारी, सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक हेमंत माने, संचालक शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नरहरी झिरवाळ : जादा दरामुळे ‘कादवा’ उत्तर महाराष्ट्रात आदर्श appeared first on पुढारी.

Exit mobile version