नरेश कारडांवर तिसरा गुन्हा दाखल

नरेश कारडा पोलिस कोठडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एक कोटी २० लाखांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, हा तिसरा गुन्हा आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.( Naresh Karda Case )

मुंबई नाका पोलिसांत नरेश कारडा यांच्यासह मनोहर कारडा, देवेश कारडा, संदीप शहा यांच्याविरोधात एक कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, नरेश कारडा यांना शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली होती. गेल्या ३० ऑक्टोबरपासून कारडा पोलिस कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून कारागृहात रवानगी केली गेली. सध्या ते कारागृहात असून, उपनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. नंदिनी पवन उफाडे (३०, रा. सदनिका क्र. १०४, श्रद्धा निवास, आनंदनगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत कारडा यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. १६ मार्च ते २१ आॅक्टोबर २०२३ या काळात देवळाली शिवारातील हरिओमनगर आर्टिलरी सेंटर येथे वेळोवेळी सदनिका व्यवहारापोटी नरेश कारडा यांनी १८ लाख ३८ हजार ९६३ रुपये घेतले. यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, मुदतीत बांधकाम न केल्याने, फायनान्स कंपनीने सदर सदनिका लिलावात काढली. कारडा यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

पोलिसांकडून कस्टडी?

नरेश कारडा सध्या कारागृहात आहेत. त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, या गुन्ह्यांमुळे उपनगर पोलिसांकडून त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. अशात जामीन झाल्यानंतरही नरेश कारडा यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नरेश कारडांवर तिसरा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.