नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेले कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांच्या पोलिस कोठडीत रविवार (दि. ५) पर्यंत वाढ करण्यात आली. शुक्रवारी (दि. ३) त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आतापर्यंत कारडांविरोधात फसवणुकीच्या ७० हून अधिक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून, आणखी काही तक्रारी पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. (Naresh Karda Case Nashik)
नाशिकमधील व्यावसायिक राहुल जयप्रकाश लुणावत (४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारडा यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये नरेश कारडा यांच्यासह मनोहर कारडा, देवेश कारडा आणि संदीप शहा हे चौघे संशयित आहेत, तर त्यांचे मोठे बंधू मनोहर कारडा (५४) यांनी तणावातून गुरुवारी (दि. २) रेल्वे मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. दरम्यान, नरेश कारडा हे दि. ३० ऑक्टोबरपासून पोलिस कोठडीत आहेत. या दरम्यान मनोहर कारडा यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. परंतु, तणावग्रस्त मनोहर यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. (Naresh Karda Case Nashik)
दरम्यान, फिर्यादींनी कारडा समूहातर्फे सुरू असलेल्या एका मॉल उभारणी प्रकल्पात सन २०१९ मध्ये दोन गाळ्यांसाठी बुकिंग केले होते. त्यासाठी एक कोटी 20 लाख रुपये दिले होते. परंतु, हे बांधकाम सुरूच झाले नाही. काही कागदपत्रेही बनावट असल्याने फिर्यादींनी पैसे परत मागितले हाेते. त्यावर संशयितांनी टाळाटाळ केल्याने फिर्याद नोंदविण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांकडे आतापर्यंत 70 तक्रारी प्राप्त आहे. त्याची पडताळणी व आर्थिक फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
भावाच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती
नरेश कारडा यांचे मोठे बंधू मनोहर कारडा यांनी गुरुवारी धावत्या रेल्वे मालगाडीसमोर येत आत्महत्या केली. त्यांच्यावर शुक्रवारी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी नरेश कारडा यांना पोलिस बंदोबस्तात अमरधाममध्ये आणण्यात आले होते. यावेळी शहरातील बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ? Naresh Karda Case Nashik
राहुल लुणावत यांच्या फिर्यादीनुसार, नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे. कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी २०१९ मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातील दोन गाळे लुणावत आणि त्यांचा मित्र सतीश कोठारी यांना कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी तक्रारदारांकडून एक कोटी २० लाख रुपये घेतले होते. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तक्रारदारांनी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेतली असता, या ठिकाणी कोणताही बांधकाम प्रकल्प अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.
The post नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ appeared first on पुढारी.