नवरात्रोत्सवाच्या आवाजावर पोलिसांची नजर, मर्यादा पाळा अन्यथा…

नवरात्रोत्सव 2023 www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील काही लॉन्स, हॉटेल, सोसायटींसह मोकळ्या मैदानांमध्ये गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक मंडळांनी साउंड सिस्टीमचा वापर केला आहे. त्यामुळे या साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली आहेत. आवाज मर्यादा न पाळणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Nashik Navratri 2023)

नवरात्रोत्सवानिमित्त शहरात २०० सार्वजनिक मंडळांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यातील काहींनी दांडिया, गरब्याचेही आयोजन केले आहे. याठिकाणी साउंड सिस्टीमचा वापर केला जात आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच पोलिसांची पथकेदेखील मंडळांची अचानक पाहणी करीत आहेत. प्रत्येक मंडळाजवळ पोलिस अंमलदार आणि होमगार्ड नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळास सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले आहे. यासह डीजे आणि लेझरचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दामिनी, निर्भया पथकांनाही गरबा व दांडियाच्या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. साध्या वेशातील महिला पोलिसांसह विशेष शाखेची पथके यात्रोत्सवात नेमण्यात आली आहेत. (Nashik Navratri 2023)

खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

गरबा, दांडिया तसेच देवीदर्शन किंवा यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी शक्यतो सोन्याच्या दागिन्यांचा वापर टाळावा, कोणी संशयास्पद अथवा त्रास देत असल्यास ११२ वर कॉल करावा, लहान मुलांना गर्दीत सांभाळावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच गरबा, दांडिया आयोजकांनी डीजे व लेझरचा वापर टाळावा आणि आवाजाची मर्यादा पाळावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

The post नवरात्रोत्सवाच्या आवाजावर पोलिसांची नजर, मर्यादा पाळा अन्यथा... appeared first on पुढारी.