नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

वाहन बाजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अगोदर जागतिक मंदी त्यानंतर कोरोना महामारीचा मोठा फटका सोसणार्‍या ऑटोमोबाइल क्षेत्राला आता ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य पर्व परतले असून, दुचाकी-चारचाकीच्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघावयास मिळाली. अनेकांना घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी हवी असल्याने, शोरूमचालकांचीही मोठी कसरत बघावयास मिळत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तब्बल 190 कारचे बुकिंग करण्यात आले आहे, तर 734 दुचाकींचे बुकिंग केल्याचे समोर येत आहे. या सर्व वाहनांची डिलिव्हरी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अपेक्षित आहे. त्यामुळे शोरूमचालकांनी त्याबाबतची तयारी केली असून, सर्व ग्राहकांना मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे आवाहन असणार आहे. यंदा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने, शेतकरी वर्ग सुखावला आहे. जिल्ह्यातील ऑटोमोबाइल क्षेत्र बर्‍यापैकी शेतकरी वर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाचे सण-उत्सव जोरदार साजरे केले जाणार असून, त्यामध्ये ऑटोबाइल क्षेत्रात मोठी उलाढाल अपेक्षित आहे. कारण घटस्थापने पाठोपाठ दसरा, दिवाळी, पाडवा, भाऊबीज असे महत्त्वपूर्ण सण असल्याने, या सणांच्या मुहूर्तावर ग्राहकांचा खरेदीकडे मोठा कल असतो. अशात ऑटोमोबाइल क्षेत्राला या काळात मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, सध्या मार्केटमध्ये येणार्‍या नव्या चारचाकी वाहनांची मागणी वाढली आहे. सर्वच कंपन्यांनी आपले नवे मॉडेल बाजारात दाखल केल्याने कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा बघवायास मिळत आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना भरपूर चॉइस असल्याने, मनासारखी चारचाकी घेणे शक्य होणार आहे. सध्या ग्राहकांकडून पेट्रोल-डिझेलसह सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किमती वाढल्या
सध्या सर्वच क्षेत्रांत महागाई दिसून येत असून, त्याचा परिणाम ऑटोमोबाइल क्षेत्रावरदेखील झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, विक्रेत्यांच्या मते, वाहनांच्या किमती किंचित वाढल्या असल्या, तरी ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे चारचाकी व दुचाकी खरेदीला ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. एसयूव्ही सेगमेंटमधील कार खरेदीची विशेष क्रेझ असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

The post नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी appeared first on पुढारी.