महात्म्य नवरात्राेत्सवाचे : अविनाश पाटील
येवलेकरांचे आराध्य दैवत श्री महाकली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती देवस्थान श्री क्षेत्र कोटमगाव 1857 स्वातंत्र्यसंग्रामातील थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी येवल्यापासून 3 किलोमीटर पूर्वेस नाशिक – औरंगाबाद राज्य महामार्गालगत श्री जगदंबा देवस्थान आहे.
श्री महाकली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती स्वरूप त्रिगुणात्मक असे देवीचे रूप प्राचीन काळापासून कोटमगाव देवीचे (ता. येवला) येथे आहे. या देवस्थानाबाबत आख्यायिका आहे. महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालिंदर हा सती वृंदेच्या सतित्वाच्या प्रभावाने त्रिलोक विजयी झाला. त्याला अपयश हे माहीतच नव्हते. सती वृंदेच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने उन्माद होऊन देवलोकांवर स्वारी केली. सर्व देवांनी श्री विष्णूचा धावा केला. श्री विष्णूंनी त्यांच्या यशाचे गमक सती वृंदेचे सतित्व असल्याचे ओळखले आणि सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री विष्णूंनी जालिंदरचे रूप घेऊन सतीचे शीलहरण केले. शीलहरण झाल्याबरोबर दैत्यराज जालिंदर पराभूत झाला. देवाचा विजय झाला. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याबरोबर सतीने श्री विष्णूला ओळखले व तुम्ही शाळिग्राम होऊन पडाल, असा शाप दिला. शापाने श्री विष्णू शाळिग्राम रूपात या ठिकाणी म्हणजे कोटमगावी पडले. श्री विष्णूचा शोध करीत देवी श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या. तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही परत गेल्या. तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधास निघाल्या. शोधता शोधता तिघींनी श्री विष्णू कोटमगावी शाळिग्राम रूपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शापमुक्त केले आणि तिघीही या स्थळी रज, तम आणि सत्व अशा त्रिगुणात्मक रूपात वास करून राहिल्या. ते त्रिगुणात्मक गुप्तरूप एका नांगरणी करणार्या शेतकर्याच्या रूपाने अवतरित झाले, अशी ही या त्रिगुणात्मक देवीची ख्याती आहे. हे मंदिर अतिशय पुरातन असून, नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो. सर्व दूरदूरचे भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची आख्यायिका आहे. नवरात्रोत्सवात असंख्य भाविक नवसपूर्ती करण्यासाठी आई जगदंबेला येत असतात.
भक्तांच्या सोयीसाठी सुधारणा
जगदंबेच्या दरबारात उलटे टांगून आपला नवस पूर्ण करण्याची प्रथा होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पाठपुराव्यामुळे ही प्रथा बंद करण्यात आली आहे. आमदार छगन भुजबळ यांच्या आघाडी सरकारच्या कार्यकालातील सार्वजनिक बांधकाम व पर्यटन खात्यामार्फत आठ कोटींचा निधी विकासकामासाठी व नवीन धर्मशाळा, अद्ययावत दुकाने, गार्डन इत्यादी सुविधा व सुधारणेकामी वापरल्याने या देवस्थानचे रूपांतर मोठ्या जागेत झाले असून, भक्तांच्या सोयीसाठी बर्याच सुधारणा या ठिकाणी झाल्या आहेत. नऊ दिवस घटी बसणार्या भाविकांसाठी धर्मशाळा सज्ज आहे. जगंदबामातेचे नूतन मंदिर नवीन रूपात साकारले आहे. लाखो भाविकांची येथे उत्सवासाठी रीघ लागते आणि दर्शनासाठी भाविक पहाटे 3.30 पासून नम्रतेने श्री जगदंबाचरणी मस्तक टेकवण्यास येतात. नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. भजन, कीर्तन, प्रवचन आणि विविध कार्यक्रम नऊ दिवस सुरू असतात. होमपूजा होऊन या उत्सवाची सांगत होते. विजयादशमीला श्री जगदंबा सीमोल्लंघनाला जात असल्याने भाविक श्री जगदंबेचे दर्शन घेऊन विजयादशमीचा सण साजरा करतात.
हेही वाचा:
- पुणे : प्रेमात हरवला ‘ती’च्या नकाराचा हक्क
- सांगली : कन्नड शाळेत मराठी, हिंदी भाषेवर अन्याय; पालकांत नाराजी
- सातारा : आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते : शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
The post नवरात्रोत्सव : कोटमगावचे त्रिगुणात्मक दैवत श्री महालक्ष्मी appeared first on पुढारी.