नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

नाशिक, कालिका देवी मंदिर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवानंतर आता नागरिकांना नवरात्रोत्सवाची ओढ लागली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर यात्रोत्सव होत असल्याने यंदा 30 टक्के भाविक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाविकांसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय झाला असून, महिला-पुरुषांची स्वतंत्र दर्शन रांग असेल. त्याचप्रमाणे भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय उपलब्ध असून, मंदिर विश्वस्त मंडळाने भाविकांचा यंदा दोन कोटींचा विमा काढला आहे. पोलिसांनीही बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे.

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळ, पोलिस, महापालिका, महावितरण, अग्निशमन या विभागांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि.19) घेण्यात आली. या बैठकीत उत्सव काळातील भाविकांच्या सुरक्षेसह वाहतूक नियोजन, पोलिस बंदोबस्त, यात्रोत्सवातील गर्दीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले, महापालिका पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, अग्निशमनचे लीडिंग फायरमन दत्तात्रय गाडे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस. आर. झाडे या अधिकार्‍यांसह कालिकादेवी मंदिराचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव डॉ. प्रताप कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजिया, सदस्य संतोष कोठावळे, आबा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी यात्रोत्सवात निर्भया पथकांसह भाविकांच्या वेशातील महिला पोलिस बंदोबस्तासाठी नेमण्यात येतील. संस्थानाची स्वतंत्र वॉकीटॉकी प्रणाली कार्यान्वित करा, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सूचनाफलक लावा, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही रूममध्ये संस्थानाचा ऑपरेटर व पोलिस असतील, असे उपआयुक्त तांबे यांनी बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे यात्रोत्सवात गडकरी चौक ते संदीप हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा दुकाने असल्याने भाविकांना चालणे सोयीस्कर होत नाही. ही बाब लक्षात घेत यंदा रस्त्याच्या एकाच बाजूला दुकाने थाटण्यास परवानगी दिली जाणार आहे. फेरीवाल्यांना एकाच ठिकाणी उभे न राहता सतत फिरत राहण्याच्या सूचना दिल्या जातील. जेणेकरून गर्दी नियंत्रणात राहील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. तर पावसाची शक्यता गृहीत धरून मंदिराजवळ वॉटरप्रूफ मंडप उभारला जात आहे, बाहेरगावच्या भाविकांना 50 खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास उभारल्याचे अध्यक्ष केशव पाटील यांनी सांगितले.

भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी काकड आरतीची वेळ बदलली आहे. यासह वस्त्रालंकार विधी वगळता पूर्णवेळ मंदिराचा गाभारा खुला असेल. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक तैनात असतील.
– केशव पाटील, अध्यक्ष,
कालिकादेवी मंदिर ट्रस्ट, नाशिक

पोलिसांचे नियोजन
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 150 पोलिस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक पोलिसांच्या नियोजनानंतर गोल्फ क्लब, महामार्ग परिसरात वाहनतळाचे नियोजन केले जाईल. साध्या वेशातील पोलिसही भाविकांमध्ये राहणार असून, पहाटे गस्त कायम राहील. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके तैनात राहतील व मंदिरासमोरील पोलिस कक्षाची उंची वाढवण्यात येणार आहे.

महत्वाचे निर्णय :

काकड आरती पहाटे 3 वाजता, तर रात्री महाआरतीनंतर काकड आरतीपर्यंत दररोज गोंधळाचा धार्मिक कार्यक्रम
40 महिला, 20 पुरुष खासगी सुरक्षारक्षक
200 स्वयंसेवकांचे नियोजन
जनरेटरची व्यवस्था करणार
24 तास प्रथमोपचार केंद्र सुरू असेल

हेही वाचा :

The post नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय appeared first on पुढारी.