नववधू भाजली अन् बालविवाहाला वाचा फुटली; वणीत गुन्हा दाखल

वणी (नाशिक) : पहाटेची वेळ...नणंद-भावजयी गाढ झोपेत असतांना घडला प्रकार. गरम पाण्याचा ड्रम पडल्याने ते गरम पाणी अंगाखाली जाऊन भाजल्याने दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासात समजला वेगळाच प्रकार की संपूर्ण कुटुंबाची रवानगी थेट पोलिस स्टेशनमध्येच. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

याबाबत माहिती अशी, की करंजवण (ता. दिंडोरी) येथे सुदाम शंकर पंडित यांच्या घरी त्यांचे जावई संजय बिडवे, मुलगी संगीता संजय बिडवे, नातू किरण संजय बिडवे (सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी, ता. इगतपुरी) आणि अल्पवयीन मुलगी रेणुका हिची आई ज्योती पितांबर जाधव (रा. लखमापूर फाटा, मूळगाव जळगाव) यांनी करंजवण येथे सुदाम शंकर पंडित यांच्या घराच्या पडवीत २ मे २०२० ला मुलगी रेणुकाचे वय १३ वर्ष तीन महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याच्याशी चोरून लावण्यात आला होता. दरम्यान, मुलगी गायत्री ऊर्फ रेणुका किरण बिडवे, तिची सासू संगीता बिडवे, सासरे संजय बिडवे, पती किरण बिडवे हे खंबाळेवाडी येथून सुदाम शंकर पंडित हे मृत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीकरिता करंजवण (ता. दिंडोरी) येथे २४ नोव्हेंबर २०२० ला आले होते. त्या वेळी पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने मुलगी गायत्री उर्फ रेणुका किरण बिडवे व तिची ननंद प्रतीक्षा बिडवे यांच्या अंगाखाली गरम पाणी जाऊन भाजल्याने या प्रकाराचा भांडाफोड झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना पोलिस तसेच नाशिकच्या बालकल्याण समितीने मुलीचे जाबजबाब घेतले. त्यातून मुलगी रेणुकाचा बालविवाह झाल्याचा संशय आला. 

रेणुकाचा बालविवाह झाल्याचे उघड

याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. सोनवणे यांनी तसेच करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्याकडे या प्रकाराबाबत चौकशी केली. चौकशीअंती मुलगी रेणुकाचा बालविवाह किरण संजय बिडवे याच्याशी चोरून झाल्याचे उघड झाले. रेणुका हिने आपल्या जबाबात सातवीपर्यंत शिक्षण झाल्याचा, तसेच १४ वर्षे वय असल्याचा उल्लेख केल्याने पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

याबाबत करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्या फिर्यादीवरून किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता संजय बिडवे (रा. खंबाळेवाडी, ता. इगतपुरी), ज्योती पितांबर जाधव (रा. लखमापूर, ता. दिंडोरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रतन पगार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. सोनवणे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या