नवीन लाल कांद्याचा शेतकऱ्यांना दिलासा; क्विंटल तीन ते साडेतीन हजारांपर्यंत भाव

नाशिक : कांद्याच्या भावातील घसरण सुरू असताना आज उन्हाळसोबत नवीन लाल कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. लासलगाव आणि पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याचा सरासरी क्विंटलचा भाव तीन हजार एक रुपया मिळाला. तसेच उमराणे आणि पिंपळगावमध्ये नवीन लाल कांद्याला क्विंटलला सरासरी भाव साडेतीन हजारांच्या आसपास राहिला.

क्विंटलचा सरासरी भाव तीन ते साडेतीन हजारांपर्यंत

शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा अद्याप किती आहे, याचा अंदाज व्यापाऱ्यांना अद्याप आलेला नाही. त्याचा विपरित परिणाम उन्हाळसोबत नव्याने दाखल होऊ लागलेल्या लाल कांद्याच्या भावावर झाला आहे. दोन्ही कांद्याचे भाव पूर्वी क्विंटलला सरासरी चार हजार रुपयांच्या पुढे पोचले होते. त्याची घसरण होत ती अडीच हजार रुपयांपर्यंत पोचली. सोमवारी (ता. ३०) लासलगावमध्ये दोन हजार ५५१, तर पिंपळगावमध्ये दोन हजार ७५१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाली होती. उन्हाळ कांद्याला आज क्विंटलला सरासरी मिळालेला भाव बाजार समितीनिहाय असा : मुंगसे- दोन हजार २५०, कळवण- दोन हजार ७००, मनमाड- दोन हजार ६००, देवळा- दोन हजार ७००, उमराणे- दोन हजार ३००.

नवीन लाल कांद्याचा भाव
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

लासलगाव- दोन हजार ८००
मुंगसे- दोन हजार ६५०
मनमाड- दोन हजार ८००
देवळा- दोन हजार ५००