पंचवटी (नाशिक): गणेश बोडके

पंचवटी हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकर जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नाट्यगृह बंद पडलेले आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभी केलेली वस्तू अधीक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराभावी खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे.तरी हे नाट्यगृह तत्काळ खुले करण्यात यावे, अशी मागणी नाट्यप्रेमींनी केली आहे.

अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे विजय राऊत यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे नागरिकांच्या वतीने निवेदन देत मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा कार्यक्रमासाठी नागरिक नाट्यगृहाची मागणी करतात. परंतु अजून त्याबाबत काही निर्णय झालेला नाही असे उत्तर मनपा प्रशासनाकडून देण्यात येते. आधी उद्घाटनाची प्रतीक्षा होता आणि आता उद्घाटन होऊनही नाट्यगृहाला टाळे कायम आहे.

हिरावाडी परिसरात महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या नाट्यगृहाचे औपचारिक उद्घाटन १० फेब्रुवारी २०२४ झाले. चार वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहा एकरच्या जागेत २९०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून, आवारात बांधकामाच्या पश्चिमेला वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था आहे.

पुढील महिन्यात नाट्यगृहाच्या बांधकामाच्या शुभारंभाला पाच वर्ष पूर्ण होणार आहे. पंचवटी परिसरातील दुसऱ्या नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात आलेले आहे. ते देखील अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे पंचवटी परिसरातील दोन भव्य सांस्कृतिक वास्तू बंद पडलेल्या स्थितीत आहे. हिरावाडीतील नाट्यगृह तत्काळ सुरु केल्यास मनपाच्या उत्पन्नात भर पडेल. सामाजिक संस्था, कलाकारांना प्रोत्साहनही मिळणार आहे.

पंचवटी परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली प्रशस्त आणि भव्य वास्तू बंद ठेवल्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. जास्त दिवस वास्तू बंद राहिल्यास आतील पडदे, खुर्च्या, शोभेच्या वस्तू खराब होण्याची भीती आहे. मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन तात्काळ मार्ग काढावा. –विजय राऊत, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग.

असे आहे नाट्यगृह…

दोन तालीम हॉल

नाट्यगृहात दोन्ही मजल्यावर स्वतंत्र दोन तालीम हॉल आहेत. भव्य रंगमंच, सुसज्ज असा मेकअप रूम आहे. प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे, बाल्कनीत १५० आणि खाली ५०० अशा ६५० आरामदायी खुच्र्यांची आसनव्यवस्था आहे.

अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा

व्हीआयपी रूम, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा, लेटेस्ट टेक्नॉलॉजीची साउंड सिस्टिम, अत्याधुनिक स्टेज लाइट, स्वयंचलित सरकते पडदे, मुख्य रंगमंच १५ मीटर बाय १० मीटर, तालीम हॉल साडेसात बाय साडेसात मीटर आहे. संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.

साडेसातशे प्रेक्षकांची क्षमता

प्रेक्षकागृहात खाली ५०० आणि बाल्कनीत १५० अशी आरामदायी खुर्च्या आहेत. नाट्यगृह २९०० चौरस मीटर बांधकाम, संरक्षक भिंत, प्रशस्त पार्किंगमध्ये ३४७ चारचाकी, ३४५ दुचाकी, १७४ सायकली पार्क करण्यासाठी प्रशस्त व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूला प्रसाधनागृहांची व्यवस्था आहे.

हेही वाचा: