नव्या बांधकाम नियमावलीमुळे बांधकाम उद्योगाला चालना : विभागीय आयुक्त

नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लॅण्डस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. 

 नियमावलीमुळे शहरीकरण वाढेल

कालिदास कलामंदीरमध्ये क्रेडाई मेट्रोच्यावतीने आयोजित एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नाशिक शहर सर्वार्थाने सुंदर असून, एकात्मिक नियमावलीमुळे शहर आणखी सुंदर करण्याची बांधकाम व्यावसायिक व वास्तू विशारदांची जबाबदारी वाढली आहे. एकात्मिक नियमावलीमुळे शहरीकरण वेगाने वाढेल. शहर वाढत असताना नाशिक परिसरातील निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. स्वच्छतेमध्ये देशात ११ वे स्थान पटकावलेल्या नाशिकमध्ये पुढील किमान ४० वर्ष पाण्याची अडचण नसून, घनकचरा व्यवस्थापनामध्ये देखील नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, नवीन बांधकाम नियमावली तयार करताना सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले, गेल्या काही वर्षातील बांधकाम व्यवसायातील मंदी ,अनैसर्गिकरीत्या वाढलेले जमिनीचे भाव व कोव्हिडमुळे अडचणीत सापडलेल्या स्थितीत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांमुळे नव संजीवनी मिळाली आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

परवडणाऱ्या घरांची संख्या वाढेल...

स्टॅम्प ड्युटीवरील सवलत व ही एकीकृत बांधकाम नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्र तसेच यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आधारित उद्योगांना चालना मिळून अर्थचक्र फिरण्यासाठी मदत होईल. क्रेडाईचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर म्हणाले, एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरांचा समतोल विकास होण्यास मदत होईल. क्रेडाईचे राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर म्हणाले, बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांचे काम सृजनशील निर्मितीचे आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले, एकीकृत नियमावलीमुळे परवडणाऱ्या घरांची संख्या वाढण्याबरोबरच घरांच्या किमती कमी होण्यास मदत होईल. नगरविकास विभागाचे माजीसह संचालक प्रकाश भुक्ते, नगरविकास विभाग नाशिकच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक्ट अर्चना पेखळे व योगेश महाजन यांनी केले. आभार सचिव गौरव ठक्कर यांनी मानले. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात