नव्या वर्षात तयार होणार देशातील पहिला ई-पासपोर्ट; वर्षाला 3 कोटी पासपोर्टची छपाई

नाशिक रोड : नाशिक रोड प्रतिभूती मुद्रणालयातील रखडलेल्या आधुनिकीकरणाला प्रशासकीय गती मिळाली आहे. ई-पारपत्रातील इन-लेअंतर्गत सुरक्षेच्या कामाला गती येण्यासाठी निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्‍याची माहिती मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी दिली. 

नाशिक रोडच्या आयएसपी प्रेसमध्ये ई-पासपोर्टच्या इन-लेसाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या टेंडरला प्रेस महामंडळाच्या बोर्डाने मान्यता दिल्याने ई-पासपोर्टचे उत्पादन वर्षाला तीन कोटींपर्यंत जाईल, असेही जुंद्रे यांनी सांगितले आहे. अगोदरचे दीड कोटी पासपोर्ट बदलून देणे आणि नवीन दीड कोटींची मागणी पूर्ण करणे, हे काम सुरू होत आहे. ई-पासपोर्टसाठी लागणारे पन्नास टक्के इन-ले परदेशातून तयार होऊन नाशिक रोड प्रेसला येतील. हैदराबाद व नोईडा येथे उर्वरित इन-ले तयार होऊन सहा ते आठ महिन्यांत नाशिकला आल्यावर २०२१ या नव्या वर्षात सुरवातीला देशाचा पहिला ई-पासपोर्ट तयार होईल. सध्या दोन मशिनवर वर्षाला चारशे कर्मचारी दीड कोटी पासपोर्ट छपाई करतात. ई-पासपोर्टमुळे हवाई वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

...असा असणार बदल 

देशात सर्व पासपोर्ट नाशिक रोड प्रेसमध्येच छापले जातात. हे पासपोर्ट लहान पुस्तकाप्रमाणे आहेत. नवीन तंत्रज्ञानाने आता ई-पोसपोर्ट येतील. त्यात मोबाईल कार्डसारखी इलेक्ट्रानिक चीप असेल. त्यात व्यक्तीचा परिचय व शासकीय माहिती समाविष्ट असेल. पोसपोर्टच्या दोन मशिनचे आधुनिकीकरण झाले आहे. तिसरे मशिन वर्षभरात येणार आहे. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

प्रेसच्या आधुनिकीकरणामुळे पासपोर्टची छपाई जलद गतीने होऊन पासपोर्टच्या रचनेत आमूलाग्र बदल होणार आहेत. देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन प्रेसच्या कामगारांनाही आधुनिक पद्धतीने काम करण्याची संधी मिळणार आहे. - ज्ञानेश्वर जुंद्रे, मजदूर संघ