नव्या संवत्सराला द्या आरोग्यदायी आलिंगन… 

कोरोनाचा काळ हा संपूर्ण जगासाठी अत्यंत खडतर असा काळ आहे. पुढच्या काही महिन्यांत जग महामारीतून बाहेर पडेल, असा आशावादही आहे. पण हा सगळा प्रकार कशामुळे घडला, या कारणांमध्ये डोकावत असताना अनेक पैलू समोर येतात. मात्र, सगळ्या कारणांत सर्वांत प्रमुख कारण म्हणजे माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं गेल्या अनेक वर्षांत अधिकाधिक बिघडत गेलं. निसर्गाशी मैत्री असलेला माणूस निसर्गाचा शत्रू बनलाय. निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारण्यापासून तो दिवसेंदिवस लांब जातोय. निसर्गपूरक जीवनशैलीला सर्वाधिक सहाय्यभूत ठरणारी बाब म्हणजे योग-प्राणायाम-ध्यान-धारणा. सध्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि भीतिदायक वातावरणापासून स्वतःचा बचाव करायचा झाल्यास योगजीवनाला पर्याय नाही. शरीर-मन-बुद्धी यांना संतुलित ठेवण्याचा राजमार्ग म्हणजे योग. त्यामुळे अधिकाधिक घरांमध्ये योगाभ्यास, प्राणायाम नित्याचा झाल्यास कोरोनापासून मुक्ती मिळणं शक्य होऊ शकेल. 

आत्ता आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा गेल्या वेळेपेक्षा अधिक घातक असल्याचं म्हटलं जातंय, तसं दिसूनही येतंय. कॅलिफोर्नियात सध्या पाचवा स्ट्रेन धुमाकूळ घालतोय. इथंही तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मतानुसार तिसरी काय किंवा चौथी काय, कोरोना स्वरूप बदलून सतत येतच राहील. काहींच्या मते, तर पुढची अनेक वर्षे कोरोना विषाणू पृथ्वीवर राहील. त्यामुळे नवनव्या लसही येत राहतील, बनविल्या जातील, त्या सर्वांना टोचून घ्याव्या लागतील. दुसऱ्या लाटेत सुरवातीला लोक बिनधास्त होते; पण आता घाबरले आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लस या विषयांमुळे ही भीती पसरली आहे. निर्बंध पाळायला हवेत, असं सर्वांनाच वाटू लागलंय. कारण घराघरांत कोरोना हाच चर्चेचा विषय होत आहे. जवळपास प्रत्येकाच्या परिचयातील, जवळच्या व्यक्तींचं कोरोनाने निधन होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. मात्र आता या परिस्थितीतून सावरायचं असेल, तर शहाणं व्हायला हवं. काही लोक नक्कीच काळजी घेत आहेत. पण समाजातील एक वर्ग असा आहे, की तो अजिबात काळजी घेत नाही. बेफिकिरीने वागतोय. नव्या स्ट्रेनमध्ये लहान मुलं आणि तरुण मुलं अधिक संक्रमित होत आहेत. या मुलांच्या माध्यमातून कोरोना कुटुंबांमध्ये प्रवेश करतोय. विशेष म्हणजे या स्ट्रेनमध्ये वरिष्ठ नागरिक उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. 

या सगळ्यात प्रतिकारक्षमता हा कळीचा मुद्दा आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता उत्तम आहे, ते सगळ्या प्रकारच्या कोरोना विषाणूंचा सामना कदाचित करूही शकेल. जर उत्तम प्रतिकारक्षमता असणारी व्यक्ती संक्रमित झाली, तरीदेखील ती कोरोनातून अन्य लोकांच्या तुलनेत लवकर बाहेर येऊ शकेल. मृत्यू त्यांना गाठण्याची शक्यता कमीत कमी असेल. योग-प्राणायाम ही अशी गुरुकिल्ली आहे, ज्याद्वारे शरीर-मन-बुद्धी तंदुरुस्त ठेवता येणं शक्य आहे. शाळेतील मुला-मुलींसाठी, तरुण-तरुणी, स्त्री-पुरुष आणि वयोवृद्ध मंडळी या सगळ्यांसाठी योगमार्ग हा आरोग्यदायी जीवनाचा राजमार्ग ठरू शकतो, पण या मार्गावरचा प्रवास आतातरी सुरू करायलाच हवा. जगाला योग-प्राणायामाद्वारे कोरोनाशी लढण्याचं बळ मिळू शकतं, एवढी क्षमता अष्टांग योगात आहे. नव्या संवत्सरामध्ये हाच संकल्प मराठी मनांनी करायला हवा. यंदाच्या संवत्सराला आरोग्यदायी पद्धतीनं आलिंगन देण्याची ही संधी कुणाही विचारी मराठी जनांनी चुकवता कामा नये, एवढंच यानिमित्तानं नमूद करावसं वाटतं...