नांदगावची समूह संसर्गाच्या दिशेने वाटचाल? वैद्यकीय अधीक्षकांचे यंत्रणेला पत्र

नांदगाव (जि. नाशिक) : नांदगावची समूह संसर्गाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे गांभीर्य ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी, तालुक्याचे आरोग्याधिकारी व पोलिस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्राद्वारे लक्षात आणून दिले आहे. नांदगावमध्ये सकाळपासूनच ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला. आठवड्यापासून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

शुक्रवारी (ता.१२) रात्री उशिरा आलेल्या अहवालात नांदगाव पालिका क्षेत्रात ५६, ग्रामीण भागात १९ व मनमाडला १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. १७२ स्वॅब अजूनही प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी दिली. 

जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारीत नांदगाव व मनमाडमधील रुग्णांचे प्रमाण लक्षणीय असल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. वाढत्या आकडेवारीला रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याची गरज भासू लागली आहे. नांदगावसह तालुक्याची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल तर सुरू नाही ना, या शंकेने आरोग्ययंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या तालुक्यात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागू लागली असून, समूह संसर्गाच्या दिशेने वाटचाल होऊ लागल्याने यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे. वर्षभरापासून ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. तालुक्यातील सद्यःस्थितीत ते एकमेव रुग्णालय ठरले आहे. त्यावरही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ताण वाढला आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे पुन्हा एकदा डीसीएचएस रुग्णालये सुरू करण्याची गरज भासू लागली आहे. सर्दी-खोकला, ताप, अंगदुखीसारखी लक्षणे आढळल्यावर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी वाढत आहे. स्वॅब देण्यासाठी रांगा लागल्या आहेत. 

‘जनता कर्फ्यू’ आवश्यक 

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी याबाबत शुक्रवारी (ता. १२) तहसीलदार तालुका आरोग्याधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. त्यात नांदगाव शहरातील स्वामी विवेकानंदनगर, हमालवाडा, हनुमाननगर, नरेंद्रनगर, गुरुकृपानगर, मालेगाव रोड आदी ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट झाल्याचे कळविले आहे. रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य नियोजन होणे, लॉकडाउन होणे अत्यंत आवश्यक आहे. सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव समाजातील सर्व वर्गात होत असून, समूह संसर्गाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे वेळेत ‘जनता कर्फ्यू’चे नियोजन करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.