नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पावसाअभावी मनमाडसह नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

पावसाळा सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील मनमाड शहर परिसासह संपूर्ण नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट आले आहे. आता पाऊस झाला तरी पिके हातातून गेली असून नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत, तर विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकार तुमच्या पाठीशी असून, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तुम्ही धीर सोडू नका, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार, बाळासाहेब आव्हाड, अंकुश कातकडे, बाळू जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणार, आमदार सुहास कांदेंची ग्वाही appeared first on पुढारी.