नांदगाव यंत्रणेतील उदासीनता कायम! मनमाडला अद्यापही डीएचएससी सुरू नाही 

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक हाताबाहेर जात असल्याचे दिसत असूनही यंत्रणेतील उदासीनता दूर होण्याची लक्षणे दिसत नाहीत. १७ मार्चला आमदार सुहास कांदे यांनी नव्याने लढाई करू, अशी हाक दिली. प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरूच आहेत. प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाड भेटीत डीएचएससी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यालाही आता आठवडा होईल. मात्र मनमाडला अजूनही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. परिणामी मनमाडहून नांदगावकडे धाव घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. 

रुग्णांची लूट सुरुच..

एकीकडे मृत्यूचे तांडव, दुसरीकडे किरकोळ सोपस्काराअभावी अडकलेले पूर्ततेचे घोडे, अशा कमालीच्या गोंधळात तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मकतेची लढाई अडकली आहे. कोविड केअर सेंटरलाच ऑक्सिजनची जोड देण्यासाठी तालुक्याचे आरोग्याधिकारी तांत्रिक नियमांचा आधार घेत टाळाटाळ करीत आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या बैठकीला जिल्ह्याचे आरोग्याधिकारी आहेर उपस्थित होते. या बैठकीनंतर पुढे काय घडले, याचा खुलासा त्यांनीच करावा, अशी मागणी होत आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकांचा निव्वळ फार्स ठरत आहे. स्वॅबचे अहवाल येण्यास उशीर होत असल्याने गरजू नातेवाइकांनी खासगी लॅबकडे धाव घेतली आहे. त्यासाठी वाटेल त्या मनमानीप्रमाणे लोक पैसे मोजत आहेत. सीटी स्कॅनसाठी अशीच लूट सुरू आहे. तेथील अहवाल व रुग्णांनी घाबरावे, लगेचच खासगी रुग्णालयात दाखल व्हावे, यासाठी दबाव येत असल्याचा आरोप रुग्ण करत आहेत. अशा किती लॅबमधील अहवाल आरोग्य विभागास कळविले जातात, याबाबत कुणाकडेही डाटा नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता