नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये २० हजारांहून अधिक पाहुणे मुक्कामी! कोरोनामुळे घटले पर्यटक 

नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर तथा ‘रामसर’ या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याचा ३५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने झालेल्या पक्षी निरीक्षण मचाणावरील पक्षीनिरीक्षणामध्ये २० हजारांहून अधिक पाहुणे मुक्कामी असल्याचे आढळून आले. अभयारण्यात उपलब्ध असलेले खाद्य हे कारण पाहुण्याच्या वाढलेल्या मुक्कामामागील आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मात्र अभयारण्यातील पर्यटकांची संख्या घटली आहे. 

कोरोनामुळे घटले पर्यटक 
अभयारण्यात अडीचशेहून अधिक जातीचे पक्षी पाहायला मिळतात. २४ जातीचे मासे, ४०० पेक्षा अधिक वनस्पती अभयारण्यात आहेत. फेब्रुवारी संपला असताना उन्हाची तिरीप वाढत असल्याने पक्षी किती असतील, असा प्रश्‍न पक्षीप्रेमींमध्ये होता. पण मुबलक खाद्यामुळे पक्ष्यांचा मुक्काम वाढल्याचे पक्षीप्रेमींना पाहायला मिळाले. पक्षीप्रेमींच्या एक बाब निदर्शनास आली, ती म्हणजे, अभयारण्यात यंदासुद्धा अनेक पक्ष्यांनी घरटी करणे पसंत केले आहे. रंगीत करकोचाची बाभळीच्या वृक्षावर सहा घरटी आढळली आहेत. त्यामध्ये पिल्लांचा किलबिलाट ऐकायला येत होता. तसेच राखी करकोचा, पानकाडी बगळा, धनेश, जांभळी पानकोंबडी, वारकरी, घार आदी पक्ष्यांची घरटी बनत असल्याचे दिसून आले. पक्षीगणनेमध्ये पाणपक्ष्यांबरोबर गवताळ पक्षी वाढल्याचे आढळून आले.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

पक्षीगणना : खाद्य उपलब्ध असल्याचे कारण

उसाची काढणी झाली असली, तरीही गव्हाचे पीक बहरत आहे. या भागात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो. दलदल ससाणा, रंगीत करकोचा, गडवाल, तरंग, हळदी-कुंकू, थापट्या, नकटा याही पक्ष्यांचे दर्शन गणनेत घडले. पक्षीगणनेमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हडपे, अमित खरे, अनंत सरोदे, गाइड अमोल दराडे, गंगाधर अघाव, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोषन पोटे, विकास गारे, ओमकार चव्हाण, शंकर लोखंडे, आशा वानखेडे, डी. डी. फाफाळे, प्रमोद मोगल, संजय गायकवाड, एकनाथ साळवे, सुनील जाधव हे सहभागी झाले होते. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

पक्षी अभयारण्यात खाद्य उपलब्ध असल्याने पक्ष्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत आम्ही मास्क सक्तीचे केले आहे. अजून हे पक्षी मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे. -प्रथमेश हडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी